विधानसभाध्यक्षांनी मागवली सर्वच पक्षांच्या घटनेची प्रत; शिवसेना, NCP फुटीनंतर सावध पवित्रा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2024 06:02 IST2024-12-18T06:02:29+5:302024-12-18T06:02:51+5:30
राज्यात गेल्या अडीच वर्षांमध्ये मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या. राज्यातील दोन मोठे पक्ष फुटले. पक्षाची घटना किती आवश्यक आहे ते मागील घटनांमधून स्पष्ट झाले आहे.

विधानसभाध्यक्षांनी मागवली सर्वच पक्षांच्या घटनेची प्रत; शिवसेना, NCP फुटीनंतर सावध पवित्रा
लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर: विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सर्व पक्षांकडून त्यांच्या घटनेची प्रत मागवली असल्याची माहिती आहे. गेल्या काळात राज्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पडलेली फूट, त्यानंतर पक्षाच्या हक्कावरून झालेले दावे-प्रतिदावे, अपात्रतेसाठी करण्यात आलेले अर्ज, लढल्या गेलेली न्यायालयीन लढाई हे सर्व पाहता आता विधानसभा अध्यक्षांच्या कार्यालयाने सावध पवित्रा घेतला आहे.
राज्यात गेल्या अडीच वर्षांमध्ये मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या. राज्यातील दोन मोठे पक्ष फुटले. शिवसेनेतून एकनाथ शिंदे आणि समर्थक आमदार आणि खासदारांनी भाजपसोबत पुन्हा राज्यात सत्ता स्थापन केली.
या सर्व घटना पाहता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सर्व पक्षांकडून त्यांच्या घटनेची प्रत मागवली आहे. पक्षाची घटना किती आवश्यक आहे ते मागील घटनांमधून स्पष्ट झाले आहे.