भाजपची गुगली; वडेट्टीवार यांना विधानसभेत तर परब यांना परिषदेत विरोधी पक्षनेतेपद!
By यदू जोशी | Updated: December 9, 2025 05:48 IST2025-12-09T05:47:18+5:302025-12-09T05:48:55+5:30
भास्कर जाधव यांना विधानसभेचे, सतेज पाटील यांना विधान परिषदेचे पक्षनेतेपद मिळावे अशी ‘मविआ’ची इच्छा

भाजपची गुगली; वडेट्टीवार यांना विधानसभेत तर परब यांना परिषदेत विरोधी पक्षनेतेपद!
यदु जोशी
नागपूर : काँग्रेसचे विजय वडेट्टीवार यांना विधानसभेचे तर उद्धवसेनेचे अनिल परब यांना विधान परिषदेचे विरोधी पक्षनेतेपद मिळावे यासाठी सहकार्याची ऑफर भाजपने दिल्याची खात्रीलायक माहिती असून या गुगलीद्वारे महाविकास आघाडीत फूट पाडण्याची भाजपची खेळी असल्याचे म्हटले जात आहे.
उद्धवसेनेचे भास्कर जाधव यांना विधानसभेचे तर काँग्रेसचे सतेज पाटील यांना विधान परिषदेचे विरोधी पक्षनेतेपद मिळावे अशी मविआची मागणी आहे. जाधव यांच्यासाठी उद्धवसेनेने तर पाटील यांच्यासाठी काँग्रेसने अनुक्रमे विधानसभा अध्यक्ष आणि विधान परिषद सभापतींना पत्रदेखील दिले आहे.
असे असले तरी भास्कर जाधव यांच्या नावाला महायुतीत असलेल्या शिंदेसेनेने विरोध दर्शविला असल्याचे सूत्रांनी सांगितले. जाधव या पदावर आले तर त्यांचे मुख्य लक्ष्य हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिंदेसेनेचे मंत्री असतील. मात्र, वडेट्टीवार विरोधी पक्षनेते झाले तर त्यांच्या टीकेचा फोकस महायुतीतील तिन्ही पक्षांवर असेल. त्यामुळे जाधव यांच्यापेक्षा वडेट्टीवार कधीही आपल्या सोईचे असे शिंदेसेनेला वाटत आहे. त्यामुळेच जाधव यांना कोणत्याही परिस्थितीत विरोधी पक्षनेतेपद देऊ नका असा आग्रह शिंदेसेनेने धरला असल्याची माहिती आहे. मित्रपक्षाच्या या दबावानंतर भाजपने वडेट्टीवार आणि अनिल परब यांच्या नावासाठी मविआच्या काही नेत्यांना निरोप धाडल्याची माहिती आहे. विरोधी पक्षनेते निवडीचा अधिकार हा अध्यक्ष, सभापतींना असला तरी सत्तापक्षाची त्यात नेहमीच भूमिका असते असा आजवरचा अनुभव आहे.
महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी मात्र भाजपच्या कोणत्याही दबावाला बळी न पडता विधान परिषदेत सतेज पाटील आणि विधानसभेत जाधव यांच्या नावाचाच आग्रह धरायचा अशी भूमिका घेतली. भाजपची खेळी ही आमच्यात फूट पाडण्यासाठी आहे, पण आम्ही ठाम आहोत असे काँग्रेसच्या एका ज्येष्ठ सदस्याने सांगितले. पाटील आणि जाधव यांच्याशिवाय दुसरे कोणतेही नाव स्वीकारायचे नाही अशी भूमिका मविआच्या नेत्यांनी घेतली आहे. सतेज पाटील यांना विरोधी पक्षनेते करा या मागणीसाठी काँग्रेसचे आमदार सोमवारी सभापती प्रा. राम शिंदे यांना भेटले, मंगळवारी ते पुन्हा भेटणार आहेत.
मी स्पर्धेत नाही : आदित्य ठाकरे
विरोधी पक्षनेतेपदासाठीच्या शर्यतीत मी कुठेही नाही. भास्कर जाधव यांचेच नाव आमच्याकडून दिलेले आहे. माझे नाव समोर करण्याची खेळी ही शिंदेसेनेची आहे, असे माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी पत्रकरांना सांगितले.
तर २०१९ ची पुनरावृत्ती : शंभूराज देसाई
शिंदेसेनेचे मंत्री शंभूराज देसाई म्हणाले की, शिवसैनिकाला मुख्यमंत्री करायचे आहे असे म्हणणारे उद्धव ठाकरे स्वत:च २०१९ मध्ये मुख्यमंत्री झाले होते. आता ऐनवेळी भास्कर जाधव यांचे नाव कापून आदित्य ठाकरेंचे नाव पुढे केले जात असेल तर २०१९ ची पुनरावृत्ती होऊ शकते.
सरकार घाबरत आहे : भास्कर जाधव
शिवसेना उबाठाचे ज्येष्ठ आमदार भास्कर जाधव यांनी सरकारवर टीका केली. प्रचंड बहुमत असतानाही सरकार घाबरत आहे. त्यामुळेच विरोधी पक्षनेतेपद रिकामे ठेवण्यात आले आहे. मुख्यमंत्री आमच्या संख्येची खिल्ली उडवत आहेत. मात्र, केंद्रात भाजप विरोधात असताना त्यांच्याकडे आवश्यक संख्याबळ नसतानाही विरोधी पक्षनेतेपद देण्यात आले होते, याचा त्यांना विसर पडला आहे. हे अधिवेशन केवळ पुरवणी मागण्या मंजूर करण्यासाठी बोलाविण्यात आले आहे.