आता नाराजीचा ‘विस्तार’; छगन भुजबळ यांची उघड नाराजी, सुधीर मुनगंटीवार यांनी मांडली वेदना
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2024 05:33 IST2024-12-17T05:32:30+5:302024-12-17T05:33:57+5:30
राजेंद्र गावितांचा संताप; आता मंत्रिपद नकोच : शिवतारे भडकले; डॉ. कुटेंची भावनिक पोस्ट

आता नाराजीचा ‘विस्तार’; छगन भुजबळ यांची उघड नाराजी, सुधीर मुनगंटीवार यांनी मांडली वेदना
लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर : राज्य मंत्रिमंडळाचा रविवारी विस्तार झाल्यानंतर सोमवारी नाराजीचा विस्तार सुरू झाला. भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार, अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी नाराजीला वाट करून दिली. शिंदेसेनेचे माजी मंत्री तानाजी सावंत यांनी मौनाद्वारे नाराजी दर्शविली. याच पक्षाचे माजी मंत्री राजेंद्र गावित, विजय शिवतारे यांनी संताप व्यक्त केला. भाजपचे डॉ. संजय कुटे यांनी एक पोस्ट करून भावनांना वाट करून दिली.
मंत्रिमंडळात मुनगंटीवार, भुजबळ यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांना व इतर काहींना स्थान मिळालेले नाही. त्याचे पडसाद सोमवारी उमटले. भुजबळ समर्थकांनी काही ठिकाणी आंदोलनही केले. काही ज्येष्ठ आमदारांनी मात्र ते नाराज नसल्याचे सांगितले. मी नाराज नाही. उलट सर्वांनाच विश्वासात घेऊन आणखी चांगले काम करून दाखवेन, असे दीपक केसरकर म्हणाले. मंत्रिपद न मिळालेले बडनेराचे आमदार रवी राणा यांनी अधिवेशनाकडे पाठ केली, ते अमरावतीतच थांबले.
मुनगंटीवार यांची नाराजी; नितीन गडकरींना भेटले
सुधीर मुनगंटीवार यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्याशी दीड तास बंद दाराआड चर्चा केली. ज्यांचा मुलगा आमच्या पक्षाविरुद्ध लढला त्यांना मंत्रिपद मिळाले, असा टोला गणेश नाईक यांचे नाव न घेता मुनगंटीवार यांनी हाणला.
होय, मी नाराज आहे... भुजबळ
होय, मी नाराज आहे. मनोज जरांगे यांना अंगावर घेतले, ओबीसींचा लढा मी लढलो. त्याचे बक्षीस मिळाले, अशी प्रतिक्रिया भुजबळ यांनी दिली. जहॉं नही चैना, वहा नही रहना, असे म्हणत मंत्रिपद कितीवेळा आले-गेले, तरी भुजबळ संपला नाही, असेही ते म्हणाले.
नरेश भोंडेकर यांचा राजीनामा
भंडारा येथील शिंदेसेनेचे आमदार नरेश भोंडेकर यांनी मंत्रिपद न मिळाल्याच्या निषेधार्थ पक्षाच्या उपनेतेपदाचा आणि विदर्भ समन्वयक पदाचा राजीनामा दिला.
आम्ही लोकांना काय सांगायचे? : गावित
पालघरचे शिंदेसेनेचे आमदार राजेंद्र गावित म्हणाले, आदिवासी लोक फोन करून विचारत आहेत. आदिवासींची तुमच्या पक्षाला गरज आहे की नाही, असे प्रश्न येत आहेत, असे ते म्हणाले.
आता, नंतरही मंत्रिपद नकोच : विजय शिवतारे
शिंदेसेनेचे विजय शिवतारे म्हणाले, पद मिळाले नाही, याचे काही वाटत नाही. पण, आम्हाला मिळालेल्या वागणुकीचे वाईट वाटते. तिन्ही नेते साधे भेटायला तयार नाहीत.
तानाजी सावंतही नाराज
शिंदेसेनेचे नाराज नेते तानाजी सावंत यांच्या कार्यालयाने एक निवेदन जारी केले. सावंत साहेबांना ज्यादिवशी याबाबत बोलायचे आहे, त्यादिवशी सगळ्यांशी निश्चितपणे संपर्क साधला जाईल, असे त्यात म्हटले आहे.