विदर्भ ऐन हिवाळ्यातच जलसंकटाच्या उंबरठ्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2018 21:03 IST2018-01-02T20:53:08+5:302018-01-02T21:03:38+5:30
नागपूर जिल्ह्यासह पूर्व विदर्भातील सहाही जिल्ह्यात ३५ टक्क्यापेक्षा कमी पाणीसाठा आहे. तर अमरावती विभागातील पाच जिल्ह्यातील धरणांमध्ये सध्या अवघा ३३ टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे. गेल्यावर्षीच्या पाणीसाठ्याची तुलना केल्यास सध्या विदर्भात निम्मासुद्धा पाणीसाठा शिल्लक नाही. कमी पडलेल्या पावसामुळे विदर्भातील धरणे पुरेशा क्षमतेने भरलेली नाहीत. त्यामुळे नव्या वर्षात ऐन हिवाळ्यातच संपूर्ण विदर्भ जलसंकटाच्या उंबरठ्यावर उभा आहे.

विदर्भ ऐन हिवाळ्यातच जलसंकटाच्या उंबरठ्यावर
आॅनलाईन लोकमत
नागपूर : नागपूर जिल्ह्यासह पूर्व विदर्भातील सहाही जिल्ह्यात ३५ टक्क्यापेक्षा कमी पाणीसाठा आहे. तर अमरावती विभागातील पाच जिल्ह्यातील धरणांमध्ये सध्या अवघा ३३ टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे. गेल्यावर्षीच्या पाणीसाठ्याची तुलना केल्यास सध्या विदर्भात निम्मासुद्धा पाणीसाठा शिल्लक नाही. कमी पडलेल्या पावसामुळे विदर्भातील धरणे पुरेशा क्षमतेने भरलेली नाहीत. त्यामुळे नव्या वर्षात ऐन हिवाळ्यातच संपूर्ण विदर्भ जलसंकटाच्या उंबरठ्यावर उभा आहे.
राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूरला पेंच धरणाचा मोठा आधार आहे. पण मध्य प्रदेशातील चौराई धरणामुळे यंदा पेंच धरण पुरेसे भरलेले नाही. त्यामुळे नागपूर शहराला पुरवठा होणाऱ्या पिण्याच्या पाण्यावरही काही प्रमाणात निर्बंध यायला लागले आहेत. नागपूर जिल्ह्यातील मोठ्या धरणांमध्ये सध्या ३० टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे. धरणांमध्ये असलेला मर्यादित पाणीसाठा विचारात घेता नागपुरात ३० टक्के पाण्याची नासाडी होत असल्याचे सांगतानाच महापालिकेकडून नागपूरकरांना देण्यात येणाऱ्या पाण्याचे आॅडिट करण्याच्या हालचाली सुरू झाल्याचे नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.
राज्यातील धरणांमध्ये ६४ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. तर विदर्भात अवघा ३२.३३ टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे. राज्याच्या तुलनेत सध्या विदर्भातील धरणांमध्ये सर्वात कमी पाणीसाठा शिल्लक असल्याने ऐन हिवाळ्यातच विदर्भातील बऱ्याच भागात पाणीटंचाईची झळ पोहोचायला लागली आहे. नागपूरसारख्या शहरात पाणीपुरवठा करणाऱ्या टँकरच्या संख्येत वाढ झाली आहे. जे पाणी शिल्लक आहे, ते पिण्यासाठी पुरेसे आहे, असे सिंचन विभागाचे अधिकारी सांगतात पण आणीबाणीप्रमाणे काटकसर करून पाणी वापरण्याचा सावधगिरीचा सल्लाही सिंचन विभाग देत आहे. येत्या पावसाळ्यापर्यंत ही पाणीटंचाई कायम राहण्याची शक्यता आहे.