मनपा, नगरपालिका, नगर पंचायतींच्या निवडणुकांचा बार आता दिवाळीनंतरच ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2025 18:15 IST2025-06-24T18:14:28+5:302025-06-24T18:15:03+5:30
प्रभागरचनेच्या कार्यक्रमात महिन्याची वाढ : इच्छुकांची प्रतीक्षा लांबली

Will the elections to Municipal Corporations, Municipalities and Nagar Panchayats be held only after Diwali?
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महापालिका व नगरपालिकांच्या प्रभागरचनेचा कार्यक्रम जाहीर झाल्याने सर्वच राजकीय पक्षांनी निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. आजी-माजी नगरसेवकांसह इच्छुकही सक्रिय झाले आहेत. नागरिकांशी संपर्क वाढवला जात आहे. कार्यक्रमानुसार दिवाळीच्या आसपास या निवडणुका होतील, असा अंदाज वर्तविला जात होता. मात्र, अंतिम प्रभागरचनेची अधिसूचना प्रसिद्ध करण्यासाठी एक महिन्याची मुदतवाढ दिली आहे. तसा शासनादेश काढला आहे. याचा विचार करता नव्या वर्षातच महापालिका निवडणुकीचा मुहूर्त निघण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
नागपूर महापालिकेत साडेतीन वर्षापासून प्रशासक कार्यरत आहे. कमीअधिक प्रमाणात हीच परिस्थिती जिल्ह्यातील १५ नगरपालिका व १४ पैकी काही नगरपंचायतींची आहे. ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असल्याने निवडणूक प्रक्रिया रखडली होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने महापालिका निवडणूक घेण्याचे निर्देश कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.
चार सदस्यांचा प्रभागाचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी नोटिफिकेशन काढण्यात आले होते. त्यानुसार ११ जूनपासून प्रगणक गटाची मांडणी, गुगल मॅपवर नकाशे तयार करणे, ३१ जुलैला प्रभागरचनेचा मुसदा तयार करणे, २२ ऑगस्ट रोजी प्रभागरचना प्रसिद्ध करून त्यावर हरकती व सूचना मागवणे, ९ सप्टेंबरला प्रभागरचनेचा प्रस्ताव राज्य निवडणूक आयोगास सादर करणे, त्यानंतर २९ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर निवडणूक आयोगाने अंतिम केलेल्या प्रभागरचनेच्या अधिसूचनेस प्रसिद्धी असा कार्यक्रम आखून दिला होता.
मात्र आता अंतिम प्रभागरचना अधिसूचना प्रसिद्ध करण्यासाठी ३ ऑक्टोबर ते ६ ऑक्टोबर अशी जवळपास एक महिन्याची मुदत वाढवून देण्यात आली आहे. दरम्यान भाजपने 'मोदी सरकार ग्यारह साल बेमिसाल' या माध्यमातून महापालिका निवडणुकांची तयारी चालवली आहे. ४०० सभा व बैठका घेण्याचे नियोजन केले आहे. पक्ष संघटनेत मोठे बदल केले. आहेत. उमेदवारांची चाचपणी सुरू केली आहे. महापालिकेने अचानक रस्ते झाडून स्वच्छता मोहीम हाती घेतली आहे. असे असले तरी डिसेंबर महिन्यात विधिमंडळाचे अधिवेशन बघता निवडणुकांचा मुहूर्त नव्या वर्षात निघेल, असा तर्क लावला जात आहे.
ठळक मुद्दे
- १२ जून रोजी प्रसिद्ध वेळापत्रकात बदल
- प्रभागरचनेच्या टप्प्यांमध्ये कालावधी वाढ
- अंतिम प्रभागरचना अधिसूचना आता ६ ऑक्टोबर रोजी
- निवडणुका किमान दोन महिने उशिरा