ऑपरेशन सिंदूरचा विरोध करणाऱ्या रेजाझ सिद्दीकीवर लागणार ‘यूएपीए’?

By योगेश पांडे | Updated: May 15, 2025 00:59 IST2025-05-15T00:58:10+5:302025-05-15T00:59:53+5:30

केरळमधील अर्बन नक्षलवादी व तथाकथित मुक्त पत्रकार रेजाझ सिद्दीकीवर ‘यूएपीए’ लागण्याची चिन्हे आहेत.

Will Rejaz Siddiqui, who opposed Operation Sindoor, be charged under UAPA? | ऑपरेशन सिंदूरचा विरोध करणाऱ्या रेजाझ सिद्दीकीवर लागणार ‘यूएपीए’?

ऑपरेशन सिंदूरचा विरोध करणाऱ्या रेजाझ सिद्दीकीवर लागणार ‘यूएपीए’?

योगेश पांडे, नागपूर: केरळमधील अर्बन नक्षलवादी व तथाकथित मुक्त पत्रकार रेजाझ सिद्दीकीवर ‘यूएपीए’ लागण्याची चिन्हे आहेत. केरळ व महाराष्ट्रातील एटीएस पथकाकडून त्याची चौकशी सुरू आहे. त्याच्या चौकशीतून जम्मू-काश्मीरमधील तरुणांचे ‘ब्रेन वॉशिंग’ करून त्यांना नक्षलवादी कारवायांत समाविष्ट करण्याचे कारस्थान समोर आले आहे. ऑपरेशन सिंदूरचा सोशल माध्यमांवर विरोध करणाऱ्या रेजाझच्या चौकशीतून आणखी मोठ्या ‘लिंक्स’ समोर येण्याची शक्यता आहे.

रेजाझ माडेपड्डी शिबा सिदीक (वय २६ एडापल्ली, केरळ) हा काही दिवसांअगोदर दिल्लीत झालेल्या परिषदेत सहभागी झाला होता. ही परिषद देशात समाजविरोधी कारवाया करणाऱ्या पत्रकारांच्या सुटकेसाठी आयोजित करण्यात आली होती. तेथे त्याची काही नक्षलसमर्थक लोकांशीदेखील भेट झाली होती. तो स्वत:ला मुक्त पत्रकार व विद्यार्थी कार्यकर्ता म्हणवायचा. 'डेमोक्रॅटिक स्टुडंट्स असोसिएशन'शी संबंधित असलेला रेजाझ दिल्लीहून केरळला परतत असताना त्याच्या मैत्रिणीला भेटण्यासाठी नागपुरात आला होता. त्याची मैत्रीण ईशा हीदेखील त्याच्या कृत्यात सहभागी होती. पोलिसांना याची माहिती मिळताच लकडगंज पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका हॉटेलमधून दोघांना ताब्यात घेण्यात आले होते. तो 'मकतूब मीडिया' आणि 'द ऑब्झर्व्हर पोस्ट'सारख्या आउटलेटसाठी प्रक्षोभक लेख लिहायचा. भारत सरकारविरोधात संघर्ष पुकारण्याच्या तयारीच्या कलमाअंतर्गत त्याला अटक करण्यात आली होती. त्याच्या चौकशीसाठी केरळ व महाराष्ट्रातील एटीएसचे पथकदेखील दाखल झाले.

घराची झडती, नातेवाइकांची चौकशी
एटीएसच्या पथकाने त्याच्या एलामक्कारा किर्थीनगर येथील घरी जाऊन झडती घेतली. तेथे पेन ड्राइव्ह व काही आक्षेपार्ह कागदपत्रे आढळली. त्यातून त्याचे पाकिस्तानच्या हँडलर्ससोबत कथित संबंध असल्याची बाबदेखील समोर आली. त्याच्या नातेवाइकांचीदेखील चौकशी करण्यात आली. त्याच्यावर काश्मीरमधील तरुणांचे ब्रेनवॉशिंग करण्याची जबाबदारी देण्यात आली होती. स्वयंसेवी संघटनेच्या माध्यमातून तेथे नेटवर्कचा विस्तार करत माओवादी विचारसरणीचा प्रचार-प्रसार करण्यावर त्याचा भर होता.

एनआयएकडूनदेखील होऊ शकते चौकशी
सध्या रेजाझ हा पोलिस कोठडीत आहे. त्याची कारस्थाने समोर आल्याने एनआयएकडून त्याचा तपास होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्याने ऑपरेशन सिंदूरविरोधात चिथावणीखोर इन्स्टाग्राम पोस्ट लिहिली होती. तो सेंट्रल एव्हेन्यूवरील अग्रसेन चौकात असलेल्या एअरगनच्या दुकानात पोहोचला होता व तिथे दोन बंदुकींसह फोटो काढत तो सोशल माध्यमांवर पोस्ट केला होता. युके-आधारित सिम कार्डद्वारे तो अनेकदा संवाद साधायचा.

विविध माओवादी संघटनांशी संबंध
रेजाझ याच्यावर यापूर्वीही अनेक गुन्हे दाखल आहेत. चौकशीदरम्यान तो केरळमधील ‘डेमोक्रॅटिक स्टुडंट युनिट’चा सदस्य असल्याची बाबदेखील समोर आली. भीमा कोरेगाव प्रकरणातील १६ आरोपींपैकी काहींशी त्याचा संपर्क होता. ‘कमिटी फॉर प्रोटेक्शन ऑफ डेमोक्रॅटिक राइट्स’ आणि ‘कमिटी अगेन्स्ट स्टेट रेप्रेशन’ याबंदी घातलेल्या संघटनांशीदेखील त्याचा संबंध होता.

Web Title: Will Rejaz Siddiqui, who opposed Operation Sindoor, be charged under UAPA?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.