लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : केंद्र शासनाने जाहीर केल्यानुसार लवकरच जातनिहाय जनगणना होणार आहे. परंतु, या जनगणनेत मराठा समाजाची ओबीसीत चुकीची नोंदणी केल्यास त्यावर आक्षेप नोंदविण्यात येईल, असे अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे प्रदेश कार्याध्यक्ष व माजी खासदार समीर भुजबळ यांनी स्पष्ट केले.
अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या पूर्व विदर्भ संवाद बैठकीसाठी सोमवारी नागपुरात आले असताना रविभवनमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. मराठा समाजाने ओबीसीत नोंदणी करणे शक्य नाही. त्यासाठी पुरावे द्यावे लागतील; परंतु तरीदेखील तसा प्रयत्न झाल्यास समता परिषदेतर्फे आक्षेप नोंदविण्यात येईल. भाटिया कमिशनच्या अहवालानुसार ओबीसींच्या ३३ हजार जागा कमी झाल्या होत्या.
त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका भाटिया कमिशनच्या अहवालापूर्वी असलेल्या आरक्षणानुसार घ्याव्यात, अशी मागणी आम्ही केली होती. ही मागणी केंद्र व राज्य शासनाने मान्य करून ओबीसींना मोठा दिलासा दिला आहे. आता संघटना मजबूत करण्यासाठी आणि जातनिहाय जनगणना यशस्वी व्हावी, यासाठी आम्ही विविध जिल्ह्यांत आढावा बैठका घेत आहोत. समता परिषदेतर्फे आजवर अनेक उपक्रम राबवून आंदोलने, रॅलींचे आयोजन करून ओबीसींच्या हक्कासाठी लढा देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला बापू भुजबळ, ईश्वर बाळबुधे व पदाधिकारी उपस्थित होते.