घरगुती वादातून पतीनं पत्नीवर गोळी झाडून केली हत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2018 07:58 IST2018-09-12T00:41:38+5:302018-09-12T07:58:15+5:30
घरगुती वादातून पतीनं पत्नीवर गोळी झाडून तिची हत्या केल्याचे धक्कादायक वृत्त समोर आले आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

घरगुती वादातून पतीनं पत्नीवर गोळी झाडून केली हत्या
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : घरगुती वादातून पतीनं पत्नीवर गोळी झाडून तिची हत्या केल्याचे धक्कादायक वृत्त समोर आले आहे. नागपुरातील सक्करदरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ही घटना आहे. येथील एका प्लायवूड व्यापा-याने पत्नीवर गोळी झाडून तिची हत्या आणि यानंतर स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मंगळवारी (11सप्टेंबर) रात्री घडलेल्या या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली. दोघांनाही गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले. रवी नागपुरे आणि मीना नागपुरे असे या दाम्पत्याचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मीनाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर, रवीची प्रकृती गंभीर आहे.
मानेवाड्यात प्लायवूडचे शॉप चालवणारा रवी नागपुरे (वय ४८) कर्जबाजारीपणामुळे आर्थिक कोंडीत सापडला होता. त्यामुळे तो सक्करदरातील दत्तात्रय नगरात सर्वश्री मंदिराजवळ एका भाड्याच्या घरात पत्नी मीना (वय ४५) सोबत राहत होता. आर्थिक कोंडीमुळे त्यांच्यात महिनाभरापासून वाद सुरू होते. पोळ्यासारखा सण असताना आर्थिक चणचणीमुळे मनासारखे काही करता आले नाही म्हणून रवी आणि मीनामध्ये वाद झाला. मंगळवारी रात्री १०.४५ वाजण्याच्या सुमारास या वादानं टोक गाठलं आणि रवीने पिस्तुलातून मीनावर गोळी झाडली. ती रक्ताच्या थारोळळ्यात कोसळल्यानंतर स्वत:वरही गोळी मारून घेतली.
दरम्यान, गोळीबाराचा आवाज ऐकून शेजाऱ्यांनी रवीच्या घराकडे धावली. रवी आणि मीना रक्ताच्या थारोळळ्यात पडून होते. शेजारी पिस्तुल पाहिल्यानंतर त्यांनी तातडीनं सक्करदरा पोलिसांना संपर्क साधला. त्यामुळे सक्करदराचा पोलीस ताफा घटनास्थळी पोहोचला. तत्पूर्वीच जखमींना रुग्णालयात हलवण्यात आले. तेथे त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू करण्यात आले. रात्री ११.४५ वाजण्याच्या सुमारास डॉक्टरांनी मीनाला मृत घोषित केले.
पिस्तुल कुठून आणले ?
दरम्यान, या घटनेमुळे उपराजधानीत खळबळ उडाली. पोलीस उपायुक्त नीलेश भरणे यांच्यासह अनेक वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी आजुबाजूच्यांकडून घटनेची माहिती जाणून घेण्याचे प्रयत्न चालविले. रवी नागपुरे हा प्लायवूडचा व्यापारी होता. यामुळे त्याच्याकडे पिस्तुल आले कुठून?, याचा शोध पोलीस घेत आहेत.