क्षुल्लक कारणावरून चिडलेल्या नवऱ्याची पत्नीला मारहाण, सासऱ्याच्या दुचाकाली लावली आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2021 13:52 IST2021-11-03T11:12:24+5:302021-11-03T13:52:40+5:30

बहीण आल्याशिवाय घरी येणार नाही, म्हणणाऱ्या पत्नीला चिडलेल्या पतीने मारहाण केली. सोबतच रागाच्या भरात सासऱ्याच्या दुचाकीलाही आग लावली.

Wife beaten, father-in-law's bike set on fire | क्षुल्लक कारणावरून चिडलेल्या नवऱ्याची पत्नीला मारहाण, सासऱ्याच्या दुचाकाली लावली आग

क्षुल्लक कारणावरून चिडलेल्या नवऱ्याची पत्नीला मारहाण, सासऱ्याच्या दुचाकाली लावली आग

नागपूर : पत्नीसोबत वाद झाल्याने संतप्त झालेल्या एका नवरोबाने तिला मारहाण केली तर सासऱ्याची दुचाकी पेटवून दिली. जरीपटक्यातील कस्तुरबा नगरात सोमवारी सकाळी ११.३० च्या सुमारास ही घटना घडली.

जयंता वसंता वाहने (वय २४) असे आरोपीचे नाव आहे. तो वाठोड्यातील शिवसुंदर नगरात राहतो. त्याची पत्नी सुब्बू तिच्या बहिणीच्या कस्तुरबानगरातील घरी आली होती. सोमवारी सकाळी जयंता तेथे आला आणि पत्नीला सोबत येण्यास सांगू लागला. माझी बहीण घरी आल्याशिवाय मी तुमच्यासोबत येणार नाही, असे पत्नी सुब्बूने जयंताला सांगितले. त्यावरून जयंता संतापला. त्याने पत्नी सुब्बूला मारहाण केली. तर, तेथे ठेवलेली सासऱ्याची दुचाकी पेटवून दिली.

दुचाकीने पेट घेतल्याने आजूबाजूच्या घरांना धोका निर्माण झाला होता. वेळीच शेजाऱ्यांनी दुचाकीची आग विझविल्याने संभाव्य दुर्घटना टळली. दरम्यान, सुब्बूने दिलेल्या तक्रारीवरून जरीपटका पोलिसांनी आरोपी जयंता वाहनेविरुद्ध गुन्हा दाखल केला.

Web Title: Wife beaten, father-in-law's bike set on fire