पत्नीने स्वतःचा पॉर्न व्हिडीओ इंटरनेटवर टाकल्याचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2025 11:48 IST2025-04-28T11:47:50+5:302025-04-28T11:48:21+5:30
Nagpur : हायकोर्टाने पतीची याचिका फेटाळली

Wife accused of posting her own porn video on the internet
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पत्नीने स्वतःचा पॉर्न व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल केल्याचा आरोप आणि पत्नीवर माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत कारवाई करण्याची मागणी करणारी पतीची याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्यानागपूर खंडपीठाने ठोस पुराव्यांअभावी फेटाळून लावली. न्यायमूर्ती महेंद्र चांदवाणी यांनी हा निर्णय दिला.
पती दिघोरी येथील रहिवासी असून कौटुंबिक वादामुळे त्याची पत्नी अमरावती येथे वेगळी राहत आहे. त्याने सुरुवातीला प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी न्यायालयामध्ये पत्नीविरुद्ध बदनामीचा दावा दाखल केला होता. पत्नीने आक्षेपार्ह भाषेत शिवीगाळ केली, असे त्याचे म्हणणे होते. ही याचिका प्रलंबित असताना पतीला एका अज्ञात व्यक्तीने पत्नीच्या पॉर्न व्हिडीओची माहिती दिली.
तो व्हिडीओ पत्नीचाच असल्याची खात्री पटल्यानंतर पतीने व्हिडीओमधील पुरुषाविरुद्ध पोलिस ठाण्यात तक्रार दाखल कर, असे पत्नीला सांगितले. परंतु, पत्नीने त्याला नकार दिला. परिणामी, पतीने त्याच्या दाव्यामध्ये माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गतच्या गुन्ह्यांचा समावेश करण्यासाठीही अर्ज केला होता.
मुद्द्यांमध्ये गुणवत्ता नाही...
- ६ फेब्रुवारी २०२५ रोजी प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी न्यायालयाने पतीचा दावा फेटाळून लावला. पत्नीने घरामध्ये अश्लील शिवीगाळ केल्याचा आरोप आहे.
- ती शिवीगाळ बाहेरच्या व्यक्तीने ऐकल्याचे पतीचे म्हणणे नाही. त्यामुळे पतीची बदनामी झाली नाही, असे निर्णयात स्पष्ट करण्यात आले. या निर्णयाविरुद्ध पतीने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.
- न्याय दंडाधिकारी न्यायालयाने माहिती तंत्रज्ञान कायद्यातील गुन्ह्यांचा विचारच केला नाही. त्यासंदर्भात पत्नीला नोटीस जारी केली नाही, असे त्याचे म्हणणे होते. उच्च न्यायालयालाही पतीच्या मुद्द्यांमध्ये गुणवत्ता आढळून आली नाही. परिणामी, त्याला दिलासा मिळाला नाही.