पत्नीने स्वीकारले अनैतिक संबंध
By Admin | Updated: July 28, 2015 04:07 IST2015-07-28T04:07:31+5:302015-07-28T04:07:31+5:30
पतीसोबत १४ वर्षांपर्यंत वैवाहिक जीवन जगणाऱ्या व चार मुलांची आई झालेल्या एका महिलेने न्यायनिवाड्याच्या

पत्नीने स्वीकारले अनैतिक संबंध
पतीला घटस्फोट : हायकोर्ट म्हणाले, ही तर क्रूरता
नागपूर : पतीसोबत १४ वर्षांपर्यंत वैवाहिक जीवन जगणाऱ्या व चार मुलांची आई झालेल्या एका महिलेने न्यायनिवाड्याच्या बैठकीमध्ये निर्लज्जपणे अनैतिक संबंधाची कबुली दिली. चारचौघात झालेल्या मानहानीमुळे पतीला प्रचंड मानसिक धक्का बसला. पत्नीचे असे वागणे पतीसोबतची क्रूरता असल्याचे निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नोंदविले आहे. तसेच, पतीला क्रूरतेच्या आधारावर घटस्फोट मंजूर केला आहे.
न्यायमूर्तीद्वय वासंती नाईक व अनंत बदर यांनी हा निर्वाळा दिला. प्रकरणातील दाम्पत्य रमेश व रश्मी (काल्पनिक नावे) नागपूर येथील रहिवासी आहे. २१ मार्च २००६ रोजी कौटुंबिक न्यायालयाने रमेशला पत्नीची क्रूरता व विभक्ततेच्या आधारावर घटस्फोट देण्यास नकार दिला होता. यामुळे त्याने उच्च न्यायालयात अपील केले होते. ३० एप्रिल १९७९ रोजी विवाह झाल्यानंतर सप्टेंबर - १९९३ पर्यंत रश्मी चांगली वागली.
यानंतर तिच्या स्वभावात अचानक बदल झाला. ती रमेशला टाळायला लागली. रमेश काही बोलायला गेल्यास तिच्या रागाचा भडका उडत होता. ती मुलांनाही विनाकारण मारत होती. तिचे शेजारच्या एका मुलासोबत अनैतिक संबंध होते. त्या मुलाच्या वडिलाने रमेशला यासंदर्भात टोकले होते. यासंदर्भात न्यायनिवाडा करण्यासाठी ५ डिसेंबर १९९५ रोजी मान्यवर व्यक्तींची बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीत रश्मी व त्या मुलाने अनैतिक संबंधाची कबुली दिली. यानंतर रश्मी वेगळी राहायला लागली. दरम्यान, घटस्फोट झाला नसतानाही रमेशने दुसरा विवाह केल्याची तक्रार रश्मीने पोलीस ठाण्यात नोंदविली. संबंधित न्यायालयाने रश्मीची तक्रार आधारहीन व खोटी असल्याचे निरीक्षण नोंदवून रमेशला आरोपमुक्त केले.
चारही मुले रमेशसोबत राहत असून रश्मीने मुलांचा ताबा मिळण्यासाठी दावाही केलेला नाही. उच्च न्यायालयाने रमेशला घटस्फोट मंजूर करताना यासह विविध बाबी विचारात घेतल्या.(प्रतिनिधी)