लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर असताना भारतीय जनता पक्षातील काही वाचाळवीरांमुळे पक्षासमोर अडचणी उभ्या ठाकल्या आहेत. पक्षातील अशा तत्त्वांविरोधात शिस्त न पाळण्याप्रकरणात कारवाईचा इशारा देत माजी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी तसे पाऊलदेखील उचलले होते व हेच पक्षाचे धोरण असल्याचे स्पष्ट केले होते. विद्यमान प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी काही नेत्यांचे बैठकांमध्ये कान टोचले असले तरी परंतु सार्वजनिकपणे अद्यापही कुणावरही कारवाईसाठी पुढाकार घेतलेला नाही. विचारणा केल्यावरदेखील ते मौन साधले.
'पार्टी विथ डिफरन्स' असे बिरूद मिरविणाऱ्या भाजपमधील काही वाचाळवीरांमुळे पक्षाच्या प्रतिमेला काहीसा तडा गेला आहे. जुन्या जाणत्या कार्यकर्त्यांमध्ये देखील याबाबत नाराजी असून राष्ट्रीय स्वयंसेवक जनतेच्या मुद्द्यांऐवजी अकारण वाद संघाकडूनदेखील निर्माण करणारे मुद्दे टाळा अशी सूचना करण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांनी पावसाळी अधिवेशनाच्या अगोदर यासंदर्भात समज दिली होती. वाचाळवीरांवर नियंत्रण आणणे हे पक्ष व प्रदेशाध्यक्षांसमोरील मोठे आव्हान राहणार आहे. रवींद्र चव्हाण हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या नागपूर दक्षिण-पश्चिम या मतदारसंघात पोहोचले व त्यांनी सामाजिक उपक्रमांचे उद्घाटन केले. यावेळी त्यांना 'लोकमत'ने वाचाळवीरांवरील कारवाईबाबत विचारले असता त्यांनी याबाबत सध्या काहीच बोलणार नाही, वेळ आल्यावर सांगेन अशी प्रतिक्रिया दिली.
पक्षाने भूमिका ठरविली, मग पालन का नाही ?सार्वजनिक व्यासपीठावर बोलताना संयम राखावा, कोणत्याही समुदायाची भावना दुखावणारी किंवा पक्षाच्या अधिकृत भूमिकेशी विसंगत वक्तव्ये करू नयेत, असे आवाहन काही दिवसांअगोदर रवींद्र चव्हाण यांनी केले होते. मात्र, वचक बसणारी कारवाई न झाल्याने वाचाळवींरावर फारसा वचक बसलेला नाही. विधानसभा निवडणुकीच्या अगोदर वाचाळवीरांमुळे महायुतीत दरी निर्माण होते की काय असे चित्र निर्माण झाले होते. त्यामुळे चंद्रशेखर बावनकुळे यांनी सार्वजनिक मंचावरून अशा नेत्यांना थेट इशारा दिला होता. एका बैठकीत महायुतीविरोधात बोलणारे माजी आमदार मल्लिकार्जुन रेड्डी यांच्यावर तडकाफडकी कारवाई करत निलंबितदेखील करण्यात आले होते. पक्षशिस्तीचे उल्लंघन करणाऱ्या किंवा पातळी सोडून बोलणाऱ्या पदाधिकाऱ्यांवर कठोर कारवाईची भूमिका पक्षाने ठरविल्याचे बावनकुळे यांनी घोषित केले होते. मात्र, प्रदेशाध्यक्ष बदलताच पक्षाने ही भूमिकादेखील बदलली की काय असा सवाल उपस्थित होत आहे.