औद्याेगिक क्षेत्रातील खड्डे बुजविणार काेण?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:22 IST2020-12-04T04:22:46+5:302020-12-04T04:22:46+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क टाकळघाट : बुटीबाेरी औद्याेगिक क्षेत्रातील मार्गावर खड्डेच-खड्डे असल्याने हा परिसर नागरिक व कामगारांसाठी पावलाेपावली धाेक्याचा आणि ...

औद्याेगिक क्षेत्रातील खड्डे बुजविणार काेण?
लाेकमत न्यूज नेटवर्क
टाकळघाट : बुटीबाेरी औद्याेगिक क्षेत्रातील मार्गावर खड्डेच-खड्डे असल्याने हा परिसर नागरिक व कामगारांसाठी पावलाेपावली धाेक्याचा आणि जीवघेणा ठरत आहे. हा मार्ग टाकळघाट-बुटीबोरी-हिंगणा शहराला जाेडणारा असून, रस्त्यात सर्वत्र खड्डे पडले आहेत. खड्डे पडलेल्या अनेक ठिकाणी डागडुजी केली नसल्याने मार्गात अपघात घडतात. त्यामुळे या रस्त्यांवरील खड्डे बुजविणार काेण, असा प्रश्न कामगार व नागरिक विचारत आहेत.
औद्योगिक क्षेत्रात काम करणारे शेकडाे कामगार बुटीबाेरी आणि टाकळघाट, टेंभरी, गणेशपूर, सुखळी, सातगाव येथे वास्तव्यास आहेत. त्यामुळे या मार्गावरील वर्दळ ही लगबगीची असते. कर्तव्यावर जाताना रस्त्यातील खड्ड्यामुळे अपघात हाेऊन अनेकांना जीवही गमवावा लागला तर कुणाला कायमचे अंपगत्व आले आहे. असे असताना संबंधित विभागाला जाग आलेली नाही. याच मार्गावरील वेणा नदीच्या पुलावरील रस्ता पूर्णत: उखडला असून, येथे दुचाकीस्वारांचे वाहनावरील नियंत्रण सुटण्याची शक्यता टाळता येत नाही. हीच स्थिती या औद्योगिक क्षेत्रातील प्रत्येक मार्गावर बघायला मिळत आहे.
इंडोरामा गेट क्र. ६ पासून गेट क्र. १ फायर स्टेशनपर्यंतच्या रस्त्यावर माेठमाेठे खड्डे पडले आहेत. या रस्त्यावर कामगार, नागरिक व शालेय विद्यार्थ्यांची सतत ये-जा असते. रात्रीच्या सुमारास रस्त्यावरील खड्डे दिसत नसल्याने दुचाकीचालकाचे नियंत्रण सुटून अपघात घडतात. त्यामुळे संबंधित विभागाने गांभीर्याने लक्ष पुरवून रस्त्याची दुरुस्ती व खड्ड्यांची डागडुजी करावी, अशी नागरिकांची मागणी आहे.
...
एकाच महिन्यात अनेक अपघात
पंचतारांकित औद्याेगिक क्षेत्रात ये-जा करणाऱ्या वर्दळीच्या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असल्याने एकाच महिन्यात अनेक छाेटे अपघात झाले आहेत. रस्त्यांवर पावलोपावली खड्ड्यांचे नकाशे दिसून येतात. खड्ड्यांमुळे अपघात हाेऊन काहींना आपला जीवही गमवावा लागला आहे.