पक्षी त्यांच्या घरट्यात जळालेल्या सिगारेटचे थोटके का ठेवतात? सिगारेट असलेल्या घरट्यातील पिल्ले अधिक आरोग्यदायी?
By निशांत वानखेडे | Updated: April 6, 2026 13:23 IST2026-04-06T13:21:27+5:302026-04-06T13:23:04+5:30
Nagpur : सिगारेट हे मानवी आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक आहे आणि दरवर्षी लाखो लोक सिगारेटच्या व्यसनाचे बळी ठरतात, हे सर्वश्रुत सत्य आहे.

Why do birds put burnt cigarette butts in their nests? Are chicks from nests with cigarettes healthier?
नागपूर : सिगारेट हे मानवी आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक आहे आणि दरवर्षी लाखो लोक सिगारेटच्या व्यसनाचे बळी ठरतात, हे सर्वश्रुत सत्य आहे. पण, आता पक्षीही या सिगारेटचा वापर करू लागली आहेत. नाही नाही, ओढण्यासाठी नाही, तर घरटी बनविण्यासाठी तो वापर होतो आहे. होय, माणसांनी ओढून फेकलेले सिगारेटचे थोटके पक्ष्यांच्या घरट्यांमध्ये आढळून येत आहेत त्यामुळे हा कचरा आहे कि त्यांनी शहरी पर्यावरणाशी जुळवून घेण्याची हुशारी शिकली आहे, हा प्रश्न आहे.
पोलंडच्या वैज्ञानिकांनी यावर महत्त्वपूर्ण संशोधन केले आहे. शहरीकरणाच्या वाढत्या प्रभावामुळे वन्यजीवांच्या वर्तनात मोठे बदल होत आहेत. त्याचे एक रंजक उदाहरण म्हणजे 'ब्ल्यू टिट' हा छोटा पक्षी. अलीकडील संशोधनानुसार, शहरी भागातील हे पक्षी आपल्या घरट्यांमध्ये सिगारेटचे थोटके वापरत आहेत. विशेष म्हणजे भारतातील चिमण्यांच्या घरट्यातही अशाप्रकारे सिगारेटचे थोटके आढळून आले आहेत. हे केवळ कचऱ्याचा अपघाती वापर नसून, परजीवी कीटकांपासून बचाव करण्यासाठीची एक अनोखी आणि अनुकूलनात्मक रणनीती असल्याचा दावा वैज्ञानिकांनी केला आहे.
नैसर्गिक अधिवासात ब्ल्यू टिट पक्षी घरट्यांमध्ये सुगंधी वनस्पतींचे तुकडे आणतात. या वनस्पतींमध्ये असलेल्या उडून जाणाऱ्या रसायनांमुळे घरट्यातील परजीवी कीटक कमी होतात. यालाच 'नेस्ट फ्यूमिगेशन' असे म्हटले जाते. मात्र, शहरांमध्ये अशा वनस्पतींची उपलब्धता कमी असते. त्याऐवजी, सिगारेटचे थोटके सहज उपलब्ध असतात. सिगारेटमध्ये असलेले निकोटीन हे प्रभावी कीटकनाशक व कीटकप्रतिबंधक मानले जाते, त्यामुळे पक्षी त्याचा वापर पर्याय म्हणून करत असावेत
प्रयोगात सिगारेट असलेल्या घरट्यातील पिल्ले अधिक आरोग्यदायी
या अभ्यासात दोन प्रकारचे प्रयोग करण्यात आले. पहिल्या गटात घरट्यांमध् सिगारेट थोटके टाकण्यात आली, तर दुसऱ्या गटात नैसर्गिक घरटे काढून त्याऐवजी पूर्णपणे स्वच्छ (स्टेराइल) कृत्रिम् घरटे ठेवण्यात आले. यानंतर पिल्लांच्या आरोग्याची तपासणी करण्यात आली. त्यासाठी हिमोग्लोबिन, ग्लुकोज, हेमॅटोक्रिट यांसारख्या रक्तातील घटकांचे मोजमाप आणि पंखांची लांबी पाहण्यात आली. परिणाम अत्यंत रोचक होते. ज्या घरट्यांमध्ये सिगारेट थोटके होती आणि कृत्रिम स्वच्छ घरट्यांमधील पिल्लांमध्ये हिमोग्लोबिन आणि हेमॅटोक्रिटची पातळी जास्त आढळली. याचा अर्थ त्यांची शारीरिक स्थिती चांगली होती. दुसरीकडे, नैसर्गिक घरट्यांमध्ये परजीवी कीटक (जसे की उवा, माइट्स, फ्लीज आणि ब्लोफ्लाय अळ्या) मोठ्या प्रमाणात आढळले. सिगारेट थोटके असलेल्या घरट्यांमध्ये हे कीटक कमी प्रमाणात होते, तर स्वच्छ घरट्यांमध्ये ते जवळपास नव्हते. यावरून असे दिसून येते की सिगारेट थोटके काही प्रमाणात कीटकनाशकासारखे काम करतात आणि पिल्लांचे संरक्षण करतात.
पण सिगारेटचा धोका कसा टाळणार?
तथापि, या वर्तनाचा दुसरा पैलूही महत्त्वाचा आहे. सिगारेट थोटक्यांमध्ये सुमारे ४००० हून अधिक रसायने असतात, ज्यात निकोटीन, आर्सेनिक, जड धातू आणि इतर विषारी घटकांचा समावेश होतो. त्यामुळे दीर्घकालीन दृष्टीने हे पक्ष्यांसाठी हानिकारक ठरू शकते. म्हणजेच, हा फायदा आणि थोका यांचा संतुलित प्रश्न आहे.
पक्ष्यांनी वातावरणाशी जुळवून घेतले
एकंदरीत, हे संशोधन दर्शवते की शहरी वातावरणात राहणारे पक्षी उपलब्ध साधनांचा उपयोग करून नवीन मार्गानी जुळवून घेत आहेत. मानवनिर्मित कचऱ्याचा वापर करून स्वतःचे संरक्षण करण्याची ही प्रवृत्ती त्यांच्या उत्क्रांतीतील बदलांचे संकेत देते. मात्र, या नव्या सवयींचे दीर्घकालीन परिणाम समजून घेण्यासाठी आणखी संशोधन आवश्यक आहे.