खावटीचे २०% कमिशन कुणाच्या घशात? सोळाशे रुपयांच्या वस्तूंसाठी मोजलेत दोन हजार
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2021 10:17 IST2021-07-31T10:15:06+5:302021-07-31T10:17:39+5:30
Khawati Yojana: आदिवासींना खावटीच्या रूपात २ हजार रुपयांच्या वस्तू देण्यात आल्या. मात्र, बाजारात प्रत्यक्ष किंमत १६०० रुपयेच आहे. शिवाय दिलेल्या वस्तू चांगल्या दर्जाच्या नाहीत.

खावटीचे २०% कमिशन कुणाच्या घशात? सोळाशे रुपयांच्या वस्तूंसाठी मोजलेत दोन हजार
नागपूर : आदिवासींना खावटीच्या रूपात २ हजार रुपयांच्या वस्तू देण्यात आल्या. मात्र, बाजारात प्रत्यक्ष किंमत १६०० रुपयेच आहे. शिवाय दिलेल्या वस्तू चांगल्या दर्जाच्या नाहीत. त्यामुळे या वस्तूंच्या खरेदीत मोठ्या प्रमाणात तडजोड झाल्याचे स्पष्ट होत असून, तब्बल २० टक्के कमिशन नेमके कुणाच्या घशात गेले, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
लॉकडाऊनमध्ये ‘खावटी’ देण्याचा निर्णय घेतला. कुटुंबांला २ हजार रुपये रोख व २ हजार रुपये वस्तू स्वरूपात मिळणार होत्या. त्यासाठी ४८६ कोटींची तरतूद झाली. वस्तूच्या रूपात मिळणारा लाभ जुलैत मिळू लागला आहे. काही लाभार्थ्यांपर्यंत १२ वस्तूंच्या धान्याचे किट पोहोचले आहेत. २३१ कोटी रुपयांचे अनुदान वस्तूरूपात ११ लाख ५५ हजार लाभार्थ्यांना वाटप होणार आहे.
असे आहे कीट
१ किलो मटकी, २ किलो चवळी, ३ किलो हरभरा, १ किलो पांढरा वाटाणा, दोन किलो तूरडाळ, १ किलो उडीदडाळ, ३ किलो मीठ, ५०० ग्रॅम गरम मसाला, १ लीटर शेंगदाणा तेल, ५०० ग्रॅम मिरची पावडर, ५०० ग्रॅम चहा पावडर व ३ किलो साखर. हे साहित्य आदिवासींपर्यंत पोहोचविण्यासाठी २४ कोटींचा वाहतूक खर्च अपेक्षित आहे.
बाजारातील दर लक्षात घेता १,६६८ रुपये खर्च येतो. ११ लाख ५५ हजार आदिवासींकरिता घाऊक खरेदी केली तर हे २ हजारांचे कीट १४०० रुपयांच्यावर नसेल. - दिनेश शेराम,
अध्यक्ष, अखिल भारतीय
आदिवासी विकास परिषद
बाजारातील किमती
मटकी - १ किलो - १०२ रुपये
चवळी - २ किलो - १८८ रुपये
हरभरा - ३ किलो - १९८ रुपये
पांढरा वाटाणा - १ किलो - ७८ रुपये
तूरडाळ - २ किलो - १९२ रुपये
उडीदडाळ - १ किलो - १०६ रुपये
मीठ - ३ किलो - ३० रुपये
गरम मसाला - ५०० ग्रॅम - १७० रुपये
शेंगदाणा तेल - १ लीटर - १७० रुपये
मिरची पावडर - १ किलो - १८० रुपये
चहा पावडर - ५०० ग्रॅम - १४० रुपये
साखर - ३ किलो - ११४ रुपये
एकूण - १२ वस्तू - १६६८ रुपये