भाजपमधील जुन्या कार्यकर्त्यांचा विचार कोण करणार? माजी आमदार पारवेंचा सवाल
By योगेश पांडे | Updated: July 28, 2025 18:18 IST2025-07-28T18:17:38+5:302025-07-28T18:18:31+5:30
महसूलमंत्री बावनकुळेंना लिहिले पत्र : कुहीच्या समन्वय समितीच्या अध्यक्षपदी जुन्या कार्यकर्त्यांना संधी देण्याची मागणी

Who will think about the old BJP workers? Question from former MLA Parve
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मागील काही काळापासून भाजपमध्ये इनकमिंगचे प्रमाण वाढले असून त्यामुळे अनेक जुन्या कार्यकर्त्यांमध्ये हातातील संधी हिरावल्या गेल्याची खंत होती. मात्र पक्षशिस्तीच्या नावाखाली ही सल कुणीही सार्वजनिकपणे बोलून दाखवत नव्हते. माजी आमदार सुधीर पारवे यांनी या जुन्याजाणत्या कार्यकर्त्यांच्या मनातील भावना उघडपणे मांडल्या आहेत. पक्षातील प्रत्येक निर्णयात, प्रत्येक निवडीमध्ये त्यांचा मान राखला गेला पाहिजे व त्यांचा विचार झालाच पाहिजे, अशी त्यांनी भूमिका मांडली आहे. त्यांनी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना पत्रच लिहून पक्षातील जुन्या कार्यकर्त्यांचा विचार कोण करणार, असा सवाल केला आहे. त्यांच्या या भूमिकेमुळे पक्षात आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
भारतीय जनता पक्षाचा एक निष्ठावान कार्यकर्ता व माजी आमदार म्हणून सलग दहा वर्षे आमदार म्हणून मी जनतेची सेवा केली आहे.
मात्र, आज मनात जुन्या कार्यकर्त्यांबाबत एक व्यथा आहे. पक्षाच्या उभारणीत ज्यांनी दिवस-रात्र झिजून घाम गाळला, त्या जुन्या व सामान्य कार्यकर्त्यांचा विचार कुणी करावा, असा सवाल पारवे यांनी उपस्थित केला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून झटणारे, दिवसरात्र एक करून काम करणारे, निस्वार्थीपणे पक्षासाठी आयुष्य घालवणारे ज्येष्ठ व प्रामाणिक कार्यकर्ते हेच या पक्षाचे खरे आधारस्तंभ आहेत. कार्यकर्त्यांच्या मनात पक्षाविषयी आदर टिकवायचा असेल, तर त्यांच्या श्रमांना सन्मान द्यावा लागेल. माझ्यासारख्या कार्यकर्त्यांच्या मनातील हळहळ आपण जाणून घ्यावी व त्या जुन्या सामान्य कार्यकर्त्यांना न्याय द्यावा. बावनकुळे यांनी नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून आणि पक्षातील वरिष्ठ म्हणून याबाबत ठाम निर्णय घ्यावा. कुही तालुक्यातील समन्वय समितीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी मला नव्हे तर एखाद्या जुन्या, निष्ठावान कार्यकर्त्याला द्यावी, अशी भूमिका पारवे यांनी पत्रातून मांडली.