नागपूर : राज्याच्या विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरवात झाली आहे. अवघ्या देशाचे लक्ष लागलेल्या महाराष्ट्राच्या निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये काट्याची टक्कर समजली जाते. सकाळी ८ वाजतापासून मतमोजणीला सुरवात झाली आहे. पहिल्या फेरीअखेर महायुतीने आघाडी घेतली आहे.
सत्तेचं महाद्वार विदर्भातून जाते असं म्हणतात त्यामुळे अवघ्या राज्याचे लक्ष असलेल्या विदर्भात सुद्धा महायुती आणि महाविकास आघाडीत चुरशीची लढत बघायला मिळत आहे. नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघातून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्या फेरीअखेर काँग्रेसच्या प्रफुल्ल गुडधे पाटील यांच्यावर १,९५० मतांनी आघाडी घेतली आहे. तसेच नागपूरच्या रामटेक मतदार संघात शिंदेसेनेचे आशिष जयस्वाल उद्धवसेनेच्या विशाल बरबटे यांच्यावर ८५८ मतांनी आघाडीवर आहेत. कामठी मतदारसंघातून पहिल्या फेरीत भाजप उमेदवार चंद्रशेखर बावनकुळे ३१८२ मतांनी आघाडीवर आहेत. उमरेड मतदारसंघातून काँग्रेसचे संजय मेश्राम ४४६३ मतांसह भाजपचे सुधीर पारवे यांच्यावर ८१३ मतांनी आघाडीवर आहेत. उत्तर नागपूर मध्ये पाहिल्या फेरीअखेर भाजपचे डॉ. मिलिंद माने यांना २२८१ मते तर काँग्रेसच्या डॉ. नितीन राऊत यांना १७६९ मते मिळाली आहेत. मध्य नागपूरमध्ये बंटी शेळके भाजपच्या प्रवीण दटके यांच्यापेक्षा ४ हजार मतांनी पुढे आहेत.