लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : काही कथा यशाच्या नसतात, त्या संवेदनांच्या असतात... आणि अशाच एका भावनिक क्षणातून ज्यांची प्रेरणादायी वाटचाल घडली आहे ते कुमार आशीर्वाद हे नागपूरचेजिल्हाधिकारी म्हणून रुजू होत आहेत. झारखंडमधील गोपालगंजमध्ये वास्तव्यास असलेले कुमार. घरची साधी परिस्थिती. एका शेतीच्या कामासाठी त्यांचे वडील प्रशासनाच्या दारात वारंवार जात होते. प्रत्येक दार ठोठावत होते... पण प्रतिसाद मात्र मिळत नव्हता. अधिकाऱ्यांच्या दारात उभं राहून, आशेने परतणाऱ्या वडिलांची तगमग त्या लहान मुलाच्या डोळ्यांसमोर दररोज उभी राहत होती. शेवटी कुणाच्या तरी सल्ल्याने वडील थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे गेले. एक भेट.... एक संवाद... आणि संपूर्ण चित्र बदलले ! जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ अर्जाची दखल घेतली, संबंधित अधिकाऱ्यांना जाब विचारला आणि काम मार्गी लावले. घरी परतताना वडिलांच्या डोळ्यांत आनंदाश्रू होते.... आणि त्या अश्रूमध्येच एका मुलाचं स्वप्न जन्माला आलं.
'जे कुणालाही जमत नाही, ते जिल्हाधिकारी करू शकतात...' ही जाणीव कुमार यांच्या मनात इतकी खोलवर रुजली की, त्याच क्षणी त्यांनी ठरवलं 'मलाही कलेक्टर व्हायचं!' २०१६ बॅचचे महाराष्ट्र कॅडरचे आयएएस अधिकारी असलेले कुमार आशीर्वाद यांनी आयआयटी खरगपूरमधून सिव्हिल इंजिनिअरिंगची पदवी घेतली. त्यांनी गडचिरोली जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम करताना प्रशासनाचा मानवी चेहरा दाखवला. प्रशासनातील कणखर निर्णय घेतानाही त्यांनी माणुसकीचा धागा कधी सोडला नाही, गडचिरोलीत त्यांनी अपंग व निराधारांसाठी घरपोच सेवा सुरू केली. अपंग दाखले, आधार कार्ड, रेशन कार्ड थेट घरी पोहोचवण्याची योजना. त्यांच्या या उपक्रमाची दखल केंद्र सरकारपर्यंत पोहोचली.
सोलापुरात महापुराच्या वेळी ते लोकांच्या दुःखात सहभागी झाले. चार-पाच दिवस त्यांनी पूरग्रस्तांमध्ये राहून त्यांच्या जखमा समजून घेतल्या. तातडीची मदत, नियोजनबद्ध उपाययोजना आणि संवेदनशील निर्णय यामुळे त्या संकटात एकाही जिवाची हानी झाली नाही. कुमार आशीर्वाद यांची कहाणी ही केवळ एका अधिकाऱ्याची नाही, तर एका मुलाच्या मनात रुजलेल्या भावनेची आहे... वडिलांच्या डोळ्यांतून ओघळलेल्या अश्रृंनी जे स्वप्न पेरलं, ते आज अनेकांच्या आयुष्यात आशेचा किरण बनून उभं आहे.
'लोकमत'च्या संवाद कार्यक्रमातच मिळाला बदलीचा आदेश
'लोकमत'च्या सोलापूर आवृत्ती कार्यालयात गुरुवारी संध्याकाळी 'संवाद' हा कार्यक्रम सुरू असतानाच कुमार आशीर्वाद यांना बदलीच्या आदेशाची माहिती मिळाली. त्यांच्या व्हॉटसअॅपवर बदली झाल्याचे समजल्यावरही त्यांनी 'लोकमत'च्या संपादकीय सहकाऱ्यांशी संवाद कायम ठेवत प्रश्नांची उत्तरे दिली. संवाद संपेपर्यंत त्यांना बदलीचा मेल मिळाला होता.
"विदर्भात यापूर्वी मी काम केले आहे. शिवाय मोठ्या सोलापूरसारख्या जिल्ह्यातील अनुभव आता गाठीशी असल्याने नागपूरमध्ये निश्चित काम करताना समाधान व आनंद वाटेल. उपराजधानीचा जिल्हा असल्याने आव्हाने मोठे असतील पण सर्वांना सोबत घेत समन्वयाने काम करणे महत्त्वाचे आहे."- कुमार आशीर्वाद, नागपूरचे नवे जिल्हाधिकारी
Web Summary : Kumar Ashirwad, Nagpur's new Collector, was inspired by his father's struggles. Witnessing his father's difficulties accessing administrative help motivated him to become a public servant. He aims to bring a humane approach to governance, evident in his work in Gadchiroli and Solapur.
Web Summary : नागपुर के नए कलेक्टर कुमार आशीर्वाद अपने पिता के संघर्षों से प्रेरित थे। प्रशासनिक मदद पाने में उनके पिता की कठिनाइयों को देखकर उन्होंने लोक सेवक बनने का फैसला किया। उनका लक्ष्य शासन में मानवीय दृष्टिकोण लाना है, जो गढ़चिरौली और सोलापुर में उनके काम से स्पष्ट है।