इंग्लंडचा व्हाईटवॉश; दक्षिण आफ्रिकेचा सलग तिसरा पराभव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:23 IST2020-12-04T04:23:43+5:302020-12-04T04:23:43+5:30
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या आफ्रिकेने इंग्लंडला १९२ धावांचे लक्ष्य दिले होते. हे आव्हान इंग्लंडने केवळ एका ...

इंग्लंडचा व्हाईटवॉश; दक्षिण आफ्रिकेचा सलग तिसरा पराभव
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या आफ्रिकेने इंग्लंडला १९२ धावांचे लक्ष्य दिले होते. हे आव्हान इंग्लंडने केवळ एका गड्याच्या मोबदल्यात पार केले. डेव्हिड मलान आणि बटलर यांच्या तुफानी अर्धशतकाच्या बळावर इंग्लंडने आफ्रिकेचा पराभव केला.
मलान आणि बटलर यांनी दुसऱ्या गड्यासाठी १६७ धावांची विक्रमी भागीदारी केली. टी-२० क्रिकेटच्या इतिहासात दुसऱ्या क्रमांकाची ही सर्वात मोठी भागीदारी ठरली. मलानने ४७ चेंडूत ९९ धावांची खेळी केली. त्यात पाच षटकार आणि ११ चौकार होते.. बटलरने ४६ चेंडूत ६७ धावांची खेळी केली. या खेळीत बटलरने ५ षटकार आणि ३ चौकार मारले. ९९ धावांच्या विजयी खेळीमुळे मलानला सामनावीर पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. याच खेळीच्या जोरावर मलान आयसीसी क्रमवारीेत नंबर वन खेळाडू बनला आहे.
त्याआधी, डु-प्लेसिस आणि दुसेन यांच्या अर्धशतकी खेळीच्या बळावर आफ्रिकेने २० षटकांत तीन गड्यांच्या मोबदल्यात १९१ धावांपर्यंत मजल मारली होती. फाफ डु प्लेसिसने नाबाद ५२ आणि दुसेन याने नाबाद ७४ धावांची भर घातली. इंग्लंडकडून बेन स्टोक्सने दोन आणि जॉर्डनने एक गडी बाद केला.