मंत्रिमंडळ फेरबदलाच्या चर्चा येतात कुठून?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2022 20:37 IST2022-02-26T20:36:46+5:302022-02-26T20:37:20+5:30
Nagpur News मी काँग्रेसचा नेता आहे. माझ्याशी अद्याप हायकमांड किंवा आमच्या पातळीवर कुठलीही चर्चा झालेली नाही, असे सांगत मंत्रिमंडळात कुठलाही फेरबदल नसल्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी शनिवारी स्पष्ट केले.

मंत्रिमंडळ फेरबदलाच्या चर्चा येतात कुठून?
नागपूर : काँग्रेसमधील फेरबदलाच्या चर्चा कुठून येतात, माहीत नाही. मी काँग्रेसचा नेता आहे. माझ्याशी अद्याप हायकमांड किंवा आमच्या पातळीवर कुठलीही चर्चा झालेली नाही, असे सांगत मंत्रिमंडळात कुठलाही फेरबदल नसल्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी शनिवारी स्पष्ट केले.
थोरात म्हणाले की, विधानसभा अध्यक्षपदाची निवड तातडीने झाली पाहिजे, हे राज्यघटनेत नमूद आहे. यामध्ये रणनीतीचा काही भाग नाही. राज्यपाल यांना पुन्हा एकदा पत्र दिले आहे. ते मान्य करतील, अशी खात्री आहे. अध्यक्षांच्या निवडीसाठी ९ मार्चची तारीख निश्चित केली आहे, असेही त्यांनी सांगितले. खासदार संभाजीराजे उपोषणाला बसत आहेत. राज्य सरकार त्यांच्या मागण्यांवर काम करत आहे. आम्ही त्यांना राज्य सरकाराच्या वतीने विनंती सुद्धा केली की उपोषणावर बसू नये. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत बैठक झाली. त्यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, अशोक चव्हाण होते. संभाजी राजे यांच्या मागण्यांवर राज्य सरकार काम करत आहे.
भाजपची राजकारण करण्याची पद्धत देशाने पाहिली आहे. कुठल्याही परिस्थितीत त्यांना सत्ता हवी आहे. त्यासाठी यंत्रणांचा वापर सुरू आहे. विविध समाजघटकांना सोबत घेण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे. ओबीसी समाजात विजय वडेट्टीवार सतत प्रयत्न करत आहेत, त्यांना आमची कायम साथ आहे, अशी पुष्टीही त्यांनी जोडली.