संजय गांधी निराधार योजनेला 'अध्यक्ष' पदाचा 'आधार' कधी?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2025 16:56 IST2025-02-19T16:54:22+5:302025-02-19T16:56:01+5:30
समिती गठीत करणे अत्यावश्यक : तरच होईल योजनेचे कार्य गतिमान

When will the post of 'President' be 'based' for the Sanjay Gandhi Niradhar Yojana?
अभय लांजेवार
लोकमत न्यूज नेटवर्क
उमरेड : अंध, दिव्यांग, अनाथ मुले, गंभीर आजारग्रस्त, घटस्फोटीत महिला आदींसह संजय गांधी निराधार अनुदान योजना हजारो निराधारांसाठी 'आधार'वड ठरते. या अतिशय महत्त्वाकांक्षी योजनेला मागील काही महिन्यांपासून अध्यक्षच नाही. साधारणतः दोन ते तीन महिन्यांपासून अध्यक्षाविना या योजनेचा कारभार सुरू आहे. संजय गांधी निराधार योजनेला अध्यक्षपदाचा 'आधार' मिळणार कधी, असा सवाल विचारला जात आहे.
राज्य आणि केंद्र सरकारच्या अखत्यारीत संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ निराधार योजना, इंदिरा गांधी विधवा योजना, इंदिरा गांधी वृद्धापकाळ योजना तसेच राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना अविरत सुरू आहे. आजमितीस उमरेड तहसीलअंतर्गत एकूण ११,८५१ लाभार्थी या योजनांचा लाभ घेतात. यामध्ये संजय गांधी निराधार योजनेचे ३,९२९, श्रावण बाळ योजनेचे ६,६०९ तसेच विधवांसाठी असलेल्या इंदिरा गांधी विधवा योजनेचे २६, वृद्धापकाळ योजनेचे १,२७१ आणि राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेचे १६ लाभार्थ्यांचा त्यात समावेश आहे.
संजय गांधी निराधार योजनेची समिती अध्यक्षांसह नऊ जणांची असते. ती गठीत केली जाते. या योजनेच्या अध्यक्षपदाचा कारभार यापूर्वी राजकुमार कोहपरे यांच्याकडे होता. दोन वर्षांच्या कालखंडात त्यांनी अंदाजे दोन हजार अर्ज मंजुरीची प्रक्रियासुद्धा केली. त्यांच्या प्रमुख उपस्थितीत २७ सप्टेंबर २०२४ ला सभा आयोजित केली होती.
त्यानंतर निवडणूक आचारसंहिता लागली. निवडणुका आटोपल्या. निकालही लागला. अद्याप नवनियुक्त अध्यक्ष आणि त्यांच्या समितीचे गठण करण्यात आले नाही. सध्या अध्यक्ष नसल्याने तहसीलदार मनोहर चव्हाण यांच्याकडे समितीचा कारभार असून, त्यांनी अर्जदारांची अडचण समजून घेत जानेवारी महिन्यात असंख्य अर्जास हिरवी झेंडी दिली. असे असले तरी संजय गांधी निराधार योजनेची समिती गठीत झाल्याशिवाय या योजनेच्या कार्याला गतिमान करता येऊ शकत नाही, असे मत व्यक्त होत आहे.
डिसेंबर २०२४ पासून संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांचे अनुदान डीबीटी पोर्टलद्वारे थेट लाभार्थ्यांच्या खात्यात वळती होत आहे. सध्या डिसेंबर २०२४ पर्यंतचे अनुदान लाभार्थ्यांना प्राप्त आहेत. डीबीटी पोर्टलमुळे अनुदानाची प्रक्रिया तातडीने होईल, अशी लाभार्थ्यांची अपेक्षा आहे.
११४ जणांचे अर्ज
जानेवारीत तहसीलदार मनोहर चव्हाण यांनी दखल घेत शेकडो अर्जास मंजुरी दिली. त्यानंतर पुन्हा अर्ज आले आहेत. सध्या ११४ जणांचे अर्ज असून, लवकरच यावरही प्रक्रिया केली जाईल, असे संबंधित कार्यालयाच्या वतीने सांगण्यात आले. असे असले तरी अध्यक्षाविना कारभाराला गती येणार नाही. हे पद महत्त्वाचे आहे, असे मत राजकुमार कोहपरे यांनी व्यक्त केले.
"संजय गांधी निराधार योजनेच्या अध्यक्षांच्या उपस्थितीत सप्टेंबर महिन्यात अखेरची सभा झाली. निवडणुकाही झाल्या. दरम्यान, अनेक अर्ज धडकले. आता जानेवारी महिन्यात सभा झाली. केवळ प्रशासकीय यंत्रणेच्या बळावर या योजनेचा वेग वाढू शकत नाही. समिती अत्यावश्यक आहे. येत्या काही दिवसांत याबाबत आम्हीही विचारणा करणार आहोत. तातडीने गोरगरीब, सर्वसामान्यांच्या या योजनेसाठी अध्यक्ष आणि समितीचे गठण करण्यात यावे."
- रितेश राऊत, उपाध्यक्ष, युवक काँग्रेस उमरेड विधानसभा