दीक्षाभूमीच्या विकासकामांना सुरुवात कधी होणार? भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांचा सवाल
By आनंद डेकाटे | Updated: July 19, 2025 19:44 IST2025-07-19T19:43:39+5:302025-07-19T19:44:22+5:30
Nagpur : धम्मचक्र प्रवर्तनदिनाला केवळ अडीच महिने शिल्लक, मुख्यमंत्री फडणवीस यांना पुन्हा दिले स्मरणपत्र

When will the development work of Deekshabhoomi begin? Question from Bhadant Arya Nagarjuna Surei Sasai
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पवित्र दीक्षाभूमीवरील बहुप्रतीक्षित विकासकामे रखडलेली आहेत. राज्य सरकारकडून २०० कोटी रुपये मंजूर करूनही तांत्रिक अडचणीमुळे काम बंद आहे. तीकधी सुरू होणार असा सवाल करीत अवघ्या अडीच महिन्यांवर आलेल्या धम्मचक्र प्रवर्तनदिनाच्या पार्श्वभूमीवर दीक्षाभूमीवरील अर्धवट कामे तातडीने पूर्ण करावीत, अशी मागणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे अध्यक्ष तथा धम्मसेना नायक भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांनी केली आहे.
भदंत ससाई यांनी पत्रकारांशी संवाद साधताना म्हटले की, "मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या रखडलेल्या कामांविषयी पत्र पाठवले असून त्यांनी नागपूर सुधार प्रन्यासला निर्देश दिले आहेत. मात्र प्रत्यक्षात काहीही हालचाल दिसत नाही." दीक्षाभूमीच्या स्तूपात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अस्थिकलश असून देश-विदेशातील अनुयायी येथे नित्यनेमाने दर्शनासाठी येतात. मात्र पावसाळ्यात पाणी स्तूपात शिरते आणि मशिनच्या साहाय्याने ते बाहेर काढावे लागते. सध्या तात्पुरत्या उपाययोजनांतर्गत स्तूपाभोवती ताळपत्री लावण्यात आली असली तरी ही समस्या कायमस्वरूपी मार्गी लागावी, अशी मागणी ससाई यांनी केली.
अर्धवट बांधकाम, अधांतरी आश्वासने
२०२४ मध्ये सुरू झालेल्या भव्य सभामंचाचे बांधकाम अद्याप पूर्ण झालेले नाही. धम्मचक्र प्रवर्तनदिनासाठी अवघा अडीच महिन्यांचा कालावधी शिल्लक असताना, कार्यक्रम भव्यदिव्य व्हावा, यासाठी हे बांधकाम तातडीने पूर्ण करणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे दीक्षाभूमीच्या चारही बाजूंनी असलेली भिंतही जीर्णावस्थेत असून तिचे काम केवळ १० टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे.
बुद्धमूर्तीसाठी चबुतरा अजूनही अपूर्ण
५६ फूट उंच चलीत मुद्रेतील तथागत गौतम बुद्धांच्या मूर्तीसाठी चबुतऱ्याचे कामदेखील सुरू झालेले नाही. याशिवाय सौरऊर्जेवर आधारित थीमबेस लायटिंगची कल्पना देखील प्रत्यक्षात यायची आहे.
"धम्मचक्र प्रवर्तनदिन हा आमच्यासाठी केवळ सोहळा नसून, तो इतिहास आणि प्रेरणेचा दिवस आहे. दीक्षाभूमीला योग्य रूप देणे ही राज्य शासनाची जबाबदारी आहे." “केवळ घोषणा आणि निधी मंजुरी पुरेसे नाही. आंबेडकरी अनुयायांच्या भावना लक्षात घेता, कामात गती आणणे हे सरकारचे कर्तव्य आहे.”
— भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई