ग्रामीण रुग्णालयाचे अपग्रेडेशन कधी?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:23 IST2020-12-04T04:23:12+5:302020-12-04T04:23:12+5:30
बाबा टेकाडे सावनेर : येथे १९७० मध्ये आरोग्य प्रशिक्षण केंद्र उभारण्यात आले. तेव्हापासून गत ५० वर्षापासून सावनेर क्षेत्रातील जनतेची ...

ग्रामीण रुग्णालयाचे अपग्रेडेशन कधी?
बाबा टेकाडे
सावनेर : येथे १९७० मध्ये आरोग्य प्रशिक्षण केंद्र उभारण्यात आले. तेव्हापासून गत ५० वर्षापासून सावनेर क्षेत्रातील जनतेची आरोग्य सेवा प्रशिक्षण केंद्राच्या भरवशावर अवलंबून आहे. या रुग्णालयात सावनेर तालुक्यातील खेड्यापाड्यातून आणि मध्य प्रदेशातून छिंदवाडा जिल्ह्यातील दुर्गम भागातून गोरगरीब रुग्ण उपचारासाठी सावनेरला मोठ्या आशेने येतात. तालुक्यात कोणतेही मोठे शासकीय रुग्णालय नाही. तरीही लोकप्रतिनिधींच्या उदासीनतेमुळे अद्यापही सावनेरच्या ग्रामीण रुग्णालयाच्या अपग्रेडेशनचे काम रखडले आहे.
या प्रशिक्षण केंद्रात आंतरवासिता विद्यार्थ्यांना (प्रशिक्षणार्थी) वैद्यकीय अधिकारी प्रशिक्षण देतात. येथे रीडर इंचार्ज (प्रपाठक), दंत्त शल्यचिकिसक यांच्यासह चार वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे मंजूर आहेत. मात्र एक स्थायी आणि दोन तात्पुरते डाॅक्टर आहेत. ऐन कारोना काळात सावनेरच्या शासकीय ग्रामीण रुग्णालयात प्रपाठक २ महिन्यांपासून वैद्यकीय रजेवर आहेत. ४ पूर्णवेळ वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे रिक्त आहेत. त्यांचे काम २ तात्पुरते वैद्यकीय अधिकारी पाहतात. यामुळे ग्रामीण रुग्णालयाची संपूर्ण जबाबदारी एका दंत्त शल्यचिकित्सकावर आली आहे. अनेकदा मागणी करूनही शासकीय रुग्णालयात तज्ज्ञ डाॅक्टर उपलब्ध झाले नाहीत. सध्या कोरोनामुळे कुणीही डाॅक्टर यायला तयार नाही. वास्तविक
प्रत्येक महिन्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर येथून २० प्रशिक्षणार्थी डाॅक्टर सावनेर प्रशिक्षण केंद्रात येतात. या प्रशिक्षणार्थीसाठी वसतिगृहसुद्धा आहे. मात्र प्रशिक्षणार्थी वसतिगृहात राहणे पसंत करीत नाहीत. सावनेर शासकीस ग्रामीण रुग्णालयात शुक्रवारी बाजाराच्या दिवशी ३०० वर रुग्ण ओपीडीत येतात. अन्य दिवशी रुग्णसंख्या २०० इतकी असते. या रुग्णांची तपासणी करताना वैद्यकीय अधिकाऱ्याची तारेवरची कसरत होते.
सुविधांचा अभाव
महत्त्वाचे म्हणजे एकही तज्ज्ञ डाॅक्टर येथे नाही. अगदी साध्या उपचाराकरिता गोरगरीब रुग्णाला नागपूरला पाठविले जाते. जे रुग्ण सावनेरला कसेतरी येतात ते नागपूरला कसे राहू शकतील, असा प्रश्न निर्माण होतो. कुत्रा चावला, साप चावला, अस्थिभंग, प्रसूती अशा साध्या उपचारासाठी दुर्गम भागातून खेड्यापाड्यातून आलेल्या रुग्णाला नागपूरचा मार्ग दाखविला जातो. अनेकदा परिस्थितीनुसार रुग्ण उपचाराविना दगावतो. किंबहुना तसाच घरी परत जातो.
फिजिओथेरपी विभाग बंद
ग्रामीण रुग्णालयात मोठ्या थाटात गाजावाजा करून फिजिओथेरपी विभाग उभारण्यात आला. मात्र उद्घाटनानंतर काही दिवसातच त्यांच्या पदरी निराशा पडली. हा विभागच बंद झाला.
रुग्णालयाच्या नवीन इमारतीची गरज
दुर्गम भागातील गोरगरीब रुग्णांना चांगली आरोग्य सुविधा मिळावी, तज्ज्ञ डाॅक्टरांकडून उपचार व्हावा यासाठी उपजिल्हा रुग्णालयाला ट्राॅमा सेटर उभारणे गरजेचे आहे. स्पेशालिटीचे युग असूनही सावनेर क्षेत्रातील रुग्णालय मात्र मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत.