When will the language of Nagpur traffic police change on the lines of Mumbai? | मुंबईच्या धर्तीवर नागपूर ट्राफिक पोलीसांची भाषा कधी बदलणार

मुंबईच्या धर्तीवर नागपूर ट्राफिक पोलीसांची भाषा कधी बदलणार

ठळक मुद्देमुंबईत वाहन चालकांशी सभ्यतेने वागण्याचे निर्देश

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : ट्रॅफिक पोलिसाच्या तोंडून तुम्हास सर, मॅडम किंवा श्रीमान, श्रीमती अशी हाक तुमच्या संदर्भात येत असेल तर आश्चर्यचकित होण्याची गरज नाही. कारण, सर्वसामान्यांशी ट्रॅफिक पोलिसांनी सभ्यतेने बोलण्याचा पुढाकार मुंबईमध्ये सुरू झाला आहे. वाहन चालक, नागरिकांशी सभ्य वागण्याचे निर्देश तेथील ट्रॅफिकचे सहपोलीस आयुक्त यशस्वी यादव यांनी दिले आहेत. सोबतच रहदारीच्या नियमांचे उल्लंघन करताना पकडलेल्या वाहन चालकांशी सौम्यतेने संवाद साधण्यास सांगण्यात आले आहे. नागपुरात मात्र असल्या तऱ्हेचे कुठलेच निर्देश अद्याप तरी नाहीत. परंतु, मुंबईत होत असलेल्या या प्रयोगाची अंमलबजावणी नागपुरातही होण्याची प्रतीक्षा नागपूरकर करत आहेत.

ट्रॅफिक संदर्भातील नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांची धरपकड करण्यासाठी रहदारी पोलिसांकडून सातत्याने अनेक मोहिमा चालविण्यात येतात. यावेळी पोलिसांकडून वाहन चालकांसोबतची वागणूक चुकीची असते. त्यामुळेच नागपूरकर पोलिसांकडून सभ्य वागणूक मिळण्यासाठी मुंबईचा प्रयोग नागपुरातही व्हावा अशी इच्छा बाळगून आहेत. महिला असो वा पुरुष, रहदारी पोलिसांकडून कायम अभद्र भाषेचाच वापर केला जातो. वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यावर जणू काही खूप मोठी घटना घडली किंवा संबंधित वाहन चालक खूप मोठा गुन्हेगार आहे, अशा तऱ्हेची वागणूक पोलिसांची असते. पोलिसांच्या अशा वागणुकीमुळे वाहनचालकांना नेहमीच अपमानजनक स्थितीचा सामना करावा लागतो. बरेचदा वादविवादाची परिस्थिती उत्पन्न होते. अनेकदा तर पोलिसांकडून संबंधितांना धमकावलेही जाते. पोलीस कर्मचाऱ्यांच्या अशा वागणुकीमुळे नागरिकही बरेचदा अटीतटीवर येत असल्याचेही निदर्शनास येते. पोलिसांकडून सभ्य वागणूक मिळायला लागल्यास वादविवादाची परिस्थिती उद्भवणार नाही. वाहन चालकही रहदारी नियमांचे उल्लंघन करण्यापासून वाचतील.

हा आहे आदेश

काही दिवसांपूर्वी यादव यांनी मुंबईच्या रहदारी पोलीस कर्मचाऱ्यांना, वाहन चालक व नागरिकांशी सभ्यतेने वागण्याचे निर्देश दिले होते. संवाद साधताना सर, मॅडम, श्रीमान, श्रीमती असे संबोधन केल्यास पोलीस आणि नागरिकांमध्ये आरोग्यदायी संवाद निर्माण होण्यास मदत होईल. यासाठी यादव यांनी कर्मचाऱ्यांना एक आठवड्याची मुदत दिली होती. याच प्रकारचा प्रयोग  पूर्वी ठाणे येथे तत्कालीन पोलीस आयुक्त डी. शिवानंद यांनी केला होता. हा प्रयोग बराच यशस्वी ठरला होता. त्याच प्रयोगाची पुनरावृत्ती यादव यांनी केली आहे. विशेष म्हणजे दोन्ही अधिकारी नागपुरातही कर्तव्यावर राहिले आहेत.

Web Title: When will the language of Nagpur traffic police change on the lines of Mumbai?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.