‘मिस्ट कुलिंग सिस्टीम’ कधी?
By Admin | Updated: February 18, 2015 02:48 IST2015-02-18T02:48:34+5:302015-02-18T02:48:34+5:30
उन्हाळ्यात रेल्वेगाडीची वाट पाहणाऱ्या प्रवाशांची लाहीलाही होते. रेल्वे प्रशासनाने प्लॅटफार्मवर त्यांच्यासाठी कुठलीच सुविधा उपलब्ध करून दिली नाही.

‘मिस्ट कुलिंग सिस्टीम’ कधी?
दयानंद पाईकराव नागपूर
उन्हाळ्यात रेल्वेगाडीची वाट पाहणाऱ्या प्रवाशांची लाहीलाही होते. रेल्वे प्रशासनाने प्लॅटफार्मवर त्यांच्यासाठी कुठलीच सुविधा उपलब्ध करून दिली नाही. गोंदिया रेल्वेस्थानकावर उन्हाळ्यात थंड हवा आणि पाण्याचा हलका फवारा मिळावा यासाठी ‘मिस्ट कुलिंग सिस्टीम’ बसविण्यात आली. परंतु नागपुरात ही सुविधाच नसल्यामुळे गोंदियाने उपराजधानीला पिछाडीवर टाकल्याचे धक्कादायक वास्तव आहे.
उपराजधानीत उन्हाळ्यात पारा ४८ पर्यंत जातो. रेल्वे प्रवाशांच्या जीवाची लाहीलाही होते. अशा परिस्थितीत रेल्वेगाडीची वाट पाहत प्लॅटफार्मवर बसण्याची कसरत त्यांना करावी लागते. प्लॅटफार्मवर सर्वच ठिकाणी पंख्यांची सुविधा नाही. पंखे असूनही त्यातून गरम हवा मिळत असल्यामुळे प्रवाशांची आणखीनच गैरसोय होते. प्रवाशांना या त्रासापासून वाचविण्यासाठी दक्षिण पूर्व मध्य रेल्वेने काही दिवसांपूर्वी गोंदिया रेल्वेस्थानकावर ‘मिस्ट कुलिंग सिस्टीम’चा शुभारंभ केला. या यंत्रणेत प्लॅटफार्मवर बसलेल्या प्रवाशांना उन्हाळ्यात थंड हवा आणि पाण्याचा हलकासा फवारा त्यांच्या अंगावर पडतो. त्यामुळे प्लॅटफार्मवरील तापमानात घट होऊन प्रवाशांना कडक उन्हापासून संरक्षण मिळते. उपराजधानीच्या रेल्वेस्थानकाला वर्ल्ड क्लास रेल्वेस्थानक करण्याची घोषणा करण्यात आली. परंतु प्रवाशांना ही सुविधा गोंदियात मिळत असेल आणि नागपुरात मिळत नसेल तर ही नक्कीच दुर्दैवाची बाब आहे. ही सिस्टीम बसविण्यासाठी प्रत्येक प्लॅटफार्मवर २५ लाखाचा खर्च अपेक्षित आहे. नागपूर रेल्वेस्थानकावर आठ प्लॅटफार्म असून येथे ही सिस्टीम बसविण्यासाठी २ कोटींचा खर्च अपेक्षित आहे. परंतु १८०० कोटींचे उत्पन्न दरवर्षी मिळवून देणाऱ्या मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाला मागील वर्षभरापासून ही सिस्टीम बसविता आली नाही. ही सिस्टीम बसविण्याचा निर्णय नागपूर पातळीवर घ्यावयाचा असूनही त्याबाबत काहीच निर्णय न झाल्यामुळे आणखी आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.