हा कोणता अलर्ट ?
By Admin | Updated: May 10, 2014 01:09 IST2014-05-10T01:09:52+5:302014-05-10T01:09:52+5:30
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाला दरवर्षी विविध मार्गाने २५00 कोटी रुपये उत्पन्न मिळते. परंतु या उत्पन्नातील एकही रुपया सुरक्षेच्या दृष्टीने खर्च होताना दिसत नाही.

हा कोणता अलर्ट ?
खुष्कीच्या मार्गाने प्रवेश : रेल्वे प्रशासनाची उदासीनता कारणीभूत
२५00 कोटी उत्पन्न, सुरक्षा भिंतीसाठी पैसा नाही
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाला दरवर्षी विविध मार्गाने २५00 कोटी रुपये उत्पन्न मिळते. परंतु या उत्पन्नातील एकही रुपया सुरक्षेच्या दृष्टीने खर्च होताना दिसत नाही. रेल्वेस्थानकाच्या आत शिरण्यासाठी असलेल्या असंख्य वाटा बंद करण्याच्या दृष्टीने येथे सुरक्षा भिंत उभारणे अत्यंत गरजेचे आहे. परंतु या गंभीर बाबीकडे रेल्वे प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याची स्थिती आहे. आरक्षण कार्यालयाच्या शेजारील एमसीओ गेटवर कुठलाच टीसी हजर नसल्यामुळे ही व्यक्ती बघा कशी सायकल घेऊन रेल्वेस्थानकाबाहेर पडत आहे. पार्सल कार्यालयातूनही येतात प्रवासी
पूर्वेकडील पार्सल कार्यालयातूनही प्रवासी रेल्वेस्थानकाच्या आत येत असल्याचे चित्र पाहणी दरम्यान आढळले. पार्सल कार्यालयाच्या परिसरात कुठलीच सुरक्षा यंत्रणा नसते. याचा फायदा घेऊन अनेक प्रवासी आत प्रवेश करताना दिसले. काही जण तर दुचाकीवर स्वार होऊन पार्सल कार्यालयाच्या बाजूने आत घुसले आणि पश्चिमेकडील भागातून बाहेर पडल्याचे धक्कादायक चित्र दृष्टीस पडले. पॅसेंजर लाऊंजशेजारील रस्ता धोक्याचा
रेल्वे सुरक्षा दलाच्या शेजारी नव्यानेच तयार करण्यात आलेल्या पॅसेंजर लाऊंजच्या बाजूने थेट प्लॅटफार्म क्रमांक एकवर जाता येते. अलीकडच्या काळात तर चारचाकी वाहनेसुद्धा येथे उभी करण्यात येत असल्याचे दिसते. या रस्त्याने आत गेल्यास कुठलीच बॅग तपासण्याची गरज नाही आणि अडविण्याची शक्यता उरत नाही. लोहापुलाजवळून गाड्यात बसतात प्रवासी
लोहापुलाजवळ रेल्वेगाड्यांचा वेग मंदावतो. त्यामुळे लोहापुलाच्या शेजारून असलेल्या वाटेने प्रवासी वर चढून रेल्वे रुळाच्या बाजूला गाडीची वाट पाहतात. गाडी आली की ते गाडीत चढतात. तसेच असंख्य प्रवासी येथेच गाडीतून खाली उतरून बाजूच्या मानस चौकातून ऑटो पकडून निघून जातात. येथेसुद्धा या प्रवाशांना अडविण्याची कुठलीच व्यवस्था नसल्याचे दिसले. क्राईम ब्रँच शेजारीच अवैध गेट
रेल्वे सुरक्षा दलाच्या क्राईम ब्रँचच्या शेजारीच रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना आत शिरण्यासाठी अवैध गेट निर्माण करून दिले आहे. येथून दिवसाकाठी असंख्य प्रवासी आपल्या सामानाची कुठलीच तपासणी न करता आत शिरतात आणि हव्या त्या रेल्वेगाडीत बसतात. अनेक वर्षांपासून हा प्रकार सातत्याने सुरू आहे. परंतु हे गेट बंद करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने आणि सुरक्षा यंत्रणेने कुठलेच पाऊल उचलले नसल्याचे दिसते. नागपूर : सहा दिवसापूर्वी चेन्नईच्या रेल्वेस्थानकावर झालेल्या बॉम्बस्फोटानंतर देशभरात 'हाय अलर्ट' जारी करण्यात आला. परंतु संवेदनशील समजल्या नागपूर रेल्वेस्थानकावर 'हाय अलर्ट'च्या सहाव्या दिवशी सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला असता अतिशय गंभीर परिस्थिती पाहावयास मिळाली. सुरक्षा व्यवस्थेला टाळून असंख्य प्रवासी खुष्कीच्या मार्गाने रेल्वेस्थानकात शिरताना दिसले. त्यांना अडविण्यासाठी कुठलीच उपाययोजना नसल्याची धक्कादायक वस्तुस्थितीही समोर आली.