धानला प्राथमिक आराेग्य केंद्राचा उपयाेग काय?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 04:08 IST2021-04-16T04:08:51+5:302021-04-16T04:08:51+5:30
चक्रधर गभणे लाेकमत न्यूज नेटवर्क रेवराल : ग्रामीण भागातील नागरिकांना चांगली आराेग्य सेवा मिळावी म्हणून राज्य शासनाने धानला (ता. ...

धानला प्राथमिक आराेग्य केंद्राचा उपयाेग काय?
चक्रधर गभणे
लाेकमत न्यूज नेटवर्क
रेवराल : ग्रामीण भागातील नागरिकांना चांगली आराेग्य सेवा मिळावी म्हणून राज्य शासनाने धानला (ता. माैदा) येथे प्राथमिक आराेग्य केंद्र मंजूर करून अद्ययावत इमारतीचे बांधकाम केले. सध्या धानला परिसरातील गावांमध्ये काेराेना संक्रमण वाढत असून, रुग्णांना उपचारासाठी माैदा, रामटेक, नागपूर व भंडारा या ठिकाणी हलवावे लागत आहे. त्यामुळे प्राथमिक आराेग्य केंद्राच्या या धूळ खात पडलेल्या इमारतीचा उपयाेग काय, असा प्रश्न या भागातील नागरिक व रुग्णांच्या कुटुंबीयांनी उपस्थित केला आहे.
शासनाने या इमारतीच्या बांधकामावर काेट्यवधी रुपये खर्च केले आहेत. अलीकडच्या काळात धानला व परिसरातील गावांमध्ये काेराेनाचे संक्रमण झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर हाेत चालली आहे. प्रभावी आराेग्यसेवेअभावी या भागातील नागरिकांना मिळेल त्या डाॅक्टरांकडून उपचार करवून घ्यावे लागत आहे. या भागातील खासगी डाॅक्टरांनी अचानक फी वाढविल्याने गरीब रुग्णांची गैरसाेय हाेत आहे. धानला येथील प्राथमिक आराेग्य केंद्र कार्यरत असते तर किमान गरीब रुग्णांची आर्थिक लूट थांबली असती व त्यांना दिलासा मिळाला असता, अशी प्रतिक्रियाही काहींनी व्यक्त केली. वाढलेल्या फीवरून डाॅक्टर व रुग्णांमध्ये प्रसंगी वाद उद्भवत असल्याचेही काहींनी सांगितले.
एकीकडे शहरांमधील शासकीय दवाखाने फुल्ल असून, हीच अवस्था ग्रामीण भागातील खासगी दवाखान्यांची आहे. त्यातच रुग्णांची हेळसांडही हाेत आहे. औषधाेपचार करूनही आराम न मिळाल्यास रुग्णांवर वारंवार डाॅक्टर बदलविण्याची वेळ येत आहे. धानला प्राथमिक आराेग्य केंद्राचा वापर सध्या काेविड केअर सेंटर व काेराेना रुग्णांवर उपचार करण्यासाठी करता येऊ शकताे. मात्र, यात राजकारण आड येत असल्याने गरीब रुग्णांचे हाल हाेत असल्याचा आराेप नागरिकांनी केला आहे.
...
लाेकप्रतिनिधींचे मूळ गावाकडे दुर्लक्ष
धानला हे आ. टेकचंद सावरकर व जिल्हा परिषदेचे कृषी सभापती तापेश्वर वैद्य तसेच जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष निशा सावरकर यांचे मूळ गाव हाेय. विशेष म्हणजे, हे लाेकप्रतिनिधी आजही त्यांच्या कुटुंबासह धानला येथेच वास्तव्याला आहेत. त्यांना या भागातील काेराेना संक्रमण, रुग्णांचे हाेणारे हाल, उपचाराअभावी हाेत असलेले मृत्यू, शहरामधील शासकीय रुग्णालयांमधील खाटांची कमतरता, खासगी हाॅस्पिटलमध्ये उपचारावर हाेणारा खर्च आणि प्राथमिक आरेाग्य केंद्राची धूळ खात पडलेली इमारत याबाबत इत्थंभूत माहिती आहे. मात्र, कुणीही ही समस्या साेडविण्यास पुढाकार घ्यायला तयार नाही.
...
खासगी डाॅक्टरांकडून लुटमार
सध्या धानला व परिसरातील काही गावांमध्ये सर्दी, खोकला, ताप व अंगदुखी अशी लक्षणे असलेल्या नागरिकांनी संख्या माेठी असून, या त्रासाने नागरिक हैराण झाले आहेत. प्रभावी शासकीय आराेग्यसेवेअभावी बहुतांश नागरिक जवळपासच्या खासगी डाॅक्टरांकडे जाऊन औषधाेपचार करवून घेत आहेत. खासगी डाॅक्टरांनीही या संकटाच्या काळात त्यांच्या फीमध्ये वाढ केल्याची माहिती अनेक रुग्ण व त्यांच्या कुटुंबीयांनी दिली. त्यांच्यावर कुणाचेही नियंत्रण नाही. हा गरीब रुग्णांना लुटण्याचा प्रकार असल्याचा आराेप अनेक नागरिकांनी केला आहे.
...
राज्य शासनाने माैदा शहरात ग्रामीण रुग्णालय मंजूर केल्याने धानला येथे प्राथमिक आराेग्य केंद्र मंजूर केले. स्थानिक राजकारणामुळे हे आराेग्य केंद्र चिरव्हा (ता. माैदा) येथे नेले. त्यामुळे धानला येथे नवीन प्राथमिक आराेग्य केंद्र मंजूर करण्यात आले. या आराेग्य केंद्रात कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात न आल्याने ते कार्यान्वित करण्यात आले नाही.
- वनिता वैद्य,
सरपंच, धानला.