इरफानबाबत काय बोलावे.. त्यांचा अभिनय हेच प्रमाण!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2020 08:57 PM2020-04-29T20:57:03+5:302020-04-29T20:57:47+5:30

आपल्या अभिनयात, साकारावयाच्या पात्रअभिनिवेषात त्रुटी राहू नये, स्वत:लाच आक्षेप वाटू नये.. असे त्यांचे प्रयत्न असे. इरफान खान यांच्या निधनाच्या पार्श्वभूमीवर हा सगळा प्रत्यक्ष अनुभव प्रसिद्ध कथा, पटकथाकार व संवादलेखिका मूळच्या नागपूरकर मनिषा कोरडे यांनी लोकमतकडे व्यक्त केला.

What to say about Irfan .. His acting is the proof! | इरफानबाबत काय बोलावे.. त्यांचा अभिनय हेच प्रमाण!

इरफानबाबत काय बोलावे.. त्यांचा अभिनय हेच प्रमाण!

Next
ठळक मुद्देमनिषा कोरडे यांनी इरफान खानसोबतच्या आठवणींना दिला उजाळा

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : इरफान खान यांच्यात स्टारडम कधीच दिसले नाही. सुपरस्टार्सप्रमाणे त्यांचे नखरे नव्हते. पटकथाकार, संवादलेखकाने लिहिलेली कथावस्तू, शब्द हेच प्रमाण मानून त्याशी समरस कसे व्हायचे, याचेच चिंतन करण्यात वेळ घालवत असत. कधीच आक्षेप नाही की त्रुटी काढायची नाही. उलट आपल्या अभिनयात, साकारावयाच्या पात्रअभिनिवेषात त्रुटी राहू नये, स्वत:लाच आक्षेप वाटू नये.. असे त्यांचे प्रयत्न असे. इरफान खान यांच्या निधनाच्या पार्श्वभूमीवर हा सगळा प्रत्यक्ष अनुभव प्रसिद्ध कथा, पटकथाकार (स्क्रिप्ट रायटर) व संवादलेखिका मूळच्या नागपूरकर मनिषा कोरडे यांनी लोकमतकडे व्यक्त केला. इरफानने त्यांच्या पटकथानक व संवाद असलेल्या बहुचर्चित बिल्लू या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली होती.
बिल्लूची पटकथा व संवाद लेखन झाल्यावर तसे माझे काम नव्हते. मात्र, सहायक दिग्दर्शक म्हणूनही प्रियदर्शन यांनी माझ्यावर जबाबदारी सोपवली होती. त्यामुळे, चित्रिकरणस्थळी मी कायम असे.  चित्रपटाच्या निमित्ताने बराच काळ त्यांना जवळून अनुभवता आल्े. विशेष म्हणजे हा चित्रपट सुपरस्टार शाहरूख खान यांचा होता आणि त्यांच्या वलयात आपण झाकोळले जाऊ या भितीने अनेक प्रसिद्ध अभिनेत्यांनी हा चित्रपट नाकारला होता. इरफानचा अभिनय सगळ्यांनीच बघितला होता आणि सुपरस्टारच्या वलयातही चमकणारा हिरा म्हणून इरफान यांची ओळख, याच चित्रपटाच्या निमित्ताने अनेकांना झाली. तमिळनाडूमध्ये चित्रिकरण सुरू झाले आणि अगदी पहिल्या दिवसापासूनच कामावर तीव्र फोकस असणारा, कुठेही लुडबुड न करणारा, दिग्दर्शकाचे ऐकणारा व संवादात कुठलाही आक्षेप न घेणारा, स्वत:च्या कुवतीवर प्रचंड भरवसा असणारा एक कलावंत सगळ्यांना अनुभवता आला. पहिल्याच दिवशी मला व प्रियदर्शन यांच्यासमोर उभा होताना त्यांनी पात्राबाबत केलेल्या तयारीचा संपूर्ण आराखडाच सादर केला. शाहरूखशी जुगलबंदी रंगणार होती म्हणून इरफान यांनी केलेली तयारी अवाक होती. ते खुप कमी बोलणारे, स्वत:च्याच चिंतनात असणारे होते. बे्रकमध्येसुद्धा व्हॅनिटीमध्ये स्वत:ला कोंडून घेत पात्राच्याच तयारीत असलेले कायम बघितल्याचे मनिषा कोरडे यांनी सांगितले. चित्रिकरणाच्या वेळी त्यांची पत्नी व मुलगाही होता. मात्र, इतरांसोबत बोलताना त्यांच्यात कुठेच अहंभाव दिसत नव्हता. अगदी जमिनीवरचा माणूस व कलावंत त्यांच्या रूपाने आम्हा सगळ्यांना अनुभवता आल्याचे मनिषा कोरडे यांनी सांगितले.

स्वत:चे शब्द कधीच घुसवले नाहीत!
: बरेच सुपरस्टार किंवा स्टार्स संवादांमध्ये स्वत:चे शब्द घुसवतात. त्यात त्यांना कौतुक वाटत असते. मात्र, इरफानला सांगितल्यावरही त्यांनी तुमच्या शब्दांवर आणि लेखनावर विश्वास आहे, असे स्पष्ट केले. त्यांच्यामुळे एक पटकथा लेखिका व संवाद लेखिका म्हणून माझा आत्मविश्वास दुणावला. असे कलावंत असतील तर कोणत्याही लेखकाचे बळ नक्कीच वाढेल, असे मनिषा कोरडे म्हणाल्या.

सगळ्यांचेच डोळे पाणावले!
बिल्लूच्या अखेरच्या सीनचे चित्रिकरण सुरू होते. त्यात शाहरूख आणि इरफान दोघेही होते. शाहरूख तर इमोशनचा बादशाहाच. त्यातही इरफान यांनी व्यक्त केलेली संवेदनशीलता पाहून संपूर्ण क्रू मेंबर्सला हेलावून गेले. सगळ्यांचे डोळे पाणावले होते.

Web Title: What to say about Irfan .. His acting is the proof!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.