समृद्धी महामार्गावरील अपघात रोखण्यासाठी सरकारकडून कोणत्या उपाययोजना? शंभूराज देसाई म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2023 01:34 PM2023-12-21T13:34:39+5:302023-12-21T13:36:32+5:30

महामार्गावर १ डिसेंबर २०२३ पर्यंत जवळपास ४५०० वाहन चालकांचे समुपदेशन करण्यात आल्याचं देसाई यांनी म्हटलं आहे.

What measures taken by the government to prevent accidents on Samriddhi Highway Shambhuraj Desai reaction | समृद्धी महामार्गावरील अपघात रोखण्यासाठी सरकारकडून कोणत्या उपाययोजना? शंभूराज देसाई म्हणाले...

समृद्धी महामार्गावरील अपघात रोखण्यासाठी सरकारकडून कोणत्या उपाययोजना? शंभूराज देसाई म्हणाले...

Samruddhi Mahamarg  ( Marathi News ) :समृद्धी महामार्गावर वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे अनेक नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे हे अपघात रोखण्यासाठी शासनाने लवकरात लवकर उपाययोजना कराव्यात, अशी मागणी प्रवाशांकडून होत होती. या पार्श्वभूमीवर मंत्री शंभूराज देसाई यांनी विधानपरिषदेत महत्त्वाची माहिती दिली. महामार्गावरील वाहतुकीस शिस्त लावणे व अपघातांची संख्या कमी करण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत असल्याचं शंभूराज देसाई यांनी सांगितलं.

शंभूराज देसाई म्हणाले की, "अपघात रोखण्यासाठी परिवहन विभागाची ८ पथके आणि महामार्ग पोलीस विभागाची १४ पथके नियुक्त करण्यात आली आहेत. समृद्धी महामार्गावर वाहन चालक व प्रवाशांच्या प्रबोधनासाठी टोल नाक्यांवर समुपदेशन केंद्र उभारण्यात आले आहेत. यामधून रस्ता सुरक्षा जनजागृती केली जाते. वाहनचालकांचे समुपदेशन केले जाते. वाहनांची तपासणी व टायर तपासणी ही समृद्धी महामार्गाच्या टोलनाक्यावर केली जाते. प्रवासी बसमध्ये प्रवाश्यांना परवान्याची व वाहनाची माहिती  सहजपणे दिसेल या करीता फिट-टू-ट्रॅव्हल असे बोर्ड प्रदर्शित केले जातात. अखिल भारतीय परवान्यावर व ऑल महाराष्ट्र वातानुकूलित कंत्राटी वाहनांची परिवहन विभागामार्फत नियमितपणे तपासणी मोहीम केली जाते," असं देसाई यांनी म्हटलं आहे.

"दोन सहाय्यक मोटर निरीक्षक यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल"

समृद्धी महामार्गावरील अपघातांबाबत पुढे बोलताना शंभूराज देसाई म्हणाले की, "ज्या ८ जिल्ह्यांमधून महामार्ग जातो त्या जिल्ह्यांमध्ये परिवहन विभागात प्रत्येकी १ तपासणी पथकाची नेमणूक केली आहे. पथकांकरिता महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून ८ वाहने उपलब्ध करून देण्यात आली आहेत. पथकांमार्फत समृद्धी महामार्गावरील वाहतुकीस शिस्त लावणे, रस्ता सुरक्षा विषयक जागृती करणे, वाहनचालकांचे समुपदेशन करणे इत्यादी रस्ता सुरक्षा विषयक कार्ये करण्यात येतात. महामार्गावर १ डिसेंबर २०२३ पर्यंत जवळपास ४५०० वाहन चालकांचे समुपदेशन करण्यात आले आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर येथील अपघातासंदर्भात वाहन चालक व प्रादेशिक परिवहन कार्यालय, छत्रपती संभाजीनगर येथील २ सहाय्यक मोटर निरीक्षक यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांना सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. सहाय्यता निधीतून मृत्यूमुखी पडलेल्यांच्या परिवारांना आर्थिक सहाय्य दिले. रस्ता सुरक्षा उपाययोजना सक्रियपणे कार्यान्वित करण्यात आली. वाहनांची तपासणी आणि योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरण करण्याबाबत कार्यवाही करण्यात आली," अशी माहितीही यावेळी शंभूराज देसाई यांनी दिली.
 

Web Title: What measures taken by the government to prevent accidents on Samriddhi Highway Shambhuraj Desai reaction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.