कर्जमाफिची योग्य वेळ कोणती ? अनिल देशमुख यांचा सत्ताधाऱ्यांवर सवाल
By गणेश हुड | Updated: August 7, 2025 17:07 IST2025-08-07T17:07:04+5:302025-08-07T17:07:46+5:30
Nagpur : बोनस आणि लाडक्या बहिणींचे २१०० रुपये कुठे गेले?

What is the right time for loan waiver? Anil Deshmukh questions the ruling party
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या नेत्यांनी शेतकऱ्यांची कर्जमाफी व सातबारा कोरा करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र सरकारला ९ महिने झाले तरी कर्जमाफी केली नाही. योग्यवेळी कर्जमाफी करु असे सत्ताधारी म्हणतात. परंतु राज्यात गेल्या दोन वर्षात ६ हजार १२६ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. आर्थिक संकटात असलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कर्जमाफी व सातबारा करण्याची हीच योग्य वेळ असल्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत सांगितले.
विदर्भातील शेतकरी धान उत्पादनात आघाडीवर असतानाही धान खरेदी आणि बोनस देण्यात सरकार अपयशी ठरत आहे. हमीभाव २३६९रुपये असताना शेतकऱ्यांना व्यापाऱ्याकडून केवळ १७००-१८०० रुपये मिळत आहेत. शासनाने जाहीर केलेल्या बोनससाठी २५ मार्च २०२५ चा आदेश असूनही बहुतांश शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळालेला नाही. केंद्रावर खताची टंचाई असून, कंपन्या लिंकींग करून जबरदस्तीने इतर वस्तू विकत आहेत. कृषी विभाग यावर कारवाई न करता केवळ केंद्रावर दोष टाकत आहे.
लाडक्या बहिणींना दरमहा २१०० रुपये देण्याचे आश्वासन दिले होते, मात्र अद्याप याची पूर्तता केलेली नाही. राज्यभरातील कंत्राटदारांचे जवळपास ९० हजार कोटी रुपये प्रलंबित आहेत. त्यातून अनेक कंत्राटदार कर्जबाजारी झाले असून, हर्षल पाटील याने आत्महत्या केली आहे. हे सरकार आश्वासने देऊन जनतेची फसवणूक करत असून, सत्ताधाऱ्यांची गुंडगिरी वाढल्याचा आरोप देशमुख यांनी केला. यावेळी माजी मंत्री रमेश बंग, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष दुनेश्वर पेठे, प्रवीण कुंटे, वेदप्रकाश आर्य, शब्बीर विद्रोही, शैलेंद्र तिवारी आदी उपस्थित होते.
९ ऑगस्टला शरद पवारांच्या उपस्थितीत मंडल यात्रा निघणार
राष्ट्रवादी कॉंग्रेस(शरद पवार गट) पक्षाच्यावतीने ९ ऑगस्ट रोजी दुपारी ११ वाजता नागपुरातील व्हेरायटी चौकातून ओबीसी जनजागृती मंडल यात्रेला सुरुवात केली जाणार आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार या यात्रेला हिरवी झेंडी दाखवितील. अशी माहिती अनिल देशमुख यांनी दिली. ही मंडल यात्रा ओबीसी समाजाच्या हक्कांसाठी आणि मंडल आयोगाच्या अंमलबजावणीचे महत्त्व जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी आयोजित करण्यात आली आहे. यात जिल्ह्यातील स्थानिक प्रश्नही मांडले जातील. शरद पवार हे राज्यात मंडल आयोगाची अंमलबजावणी करणारे पहिले मुख्यमंत्री होते.
बॅलेटवर निवडणुका घ्याव्या
ईव्हीएम व मतदार याद्यांचा घोळ, डुपलीकेट मतदार यामुळेच राज्यात महायुतीचे सरकार सत्तेवर आले. जगातील तज्ज्ञांनी ईव्हीएम सुरक्षीत नसल्याचा दावा करुन याचा निवडणुकीत वापर करू नये असे म्हणले आहे. त्यामुळे यापुढील निवडणुका बॅलेटपेपरवर घ्याव्यात अशी भूमिका अनिल देशमुख यांनी मांडली.