नागपुरातील तरुणाईला झाले तरी काय?
By Admin | Updated: July 16, 2015 02:57 IST2015-07-16T02:57:32+5:302015-07-16T02:57:32+5:30
बदलत्या काळाप्रमाणे समाजव्यवस्थेतदेखील मोठ्या प्रमाणात बदल दिसून येत आहे.

नागपुरातील तरुणाईला झाले तरी काय?
ज्येष्ठ नागरिकांसोबत गैरवर्तनात वाढ : ‘हेल्प एज इंडिया’ने समोर आणले जळजळीत वास्तव
योगेश पांडे नागपूर
बदलत्या काळाप्रमाणे समाजव्यवस्थेतदेखील मोठ्या प्रमाणात बदल दिसून येत आहे. ज्येष्ठ नागरिकांचे मार्गदर्शन घेऊन उज्ज्वल भविष्याचा पाया रचण्याचे दिवस आता मागे पडत चालले आहे. विकासाच्या दिशेने अग्रेसर होत असलेल्या नागपूर शहरातील तरुणाईची वागणूक मात्र विरुद्ध दिशेने सुरू आहे. ज्येष्ठ नागरिकांशी उर्मट वर्तन करुन अपमान करण्यात तरुणाई सर्वात जास्त आघाडीवर आहेत. ज्येष्ठ नागरिकांशी गैरवर्तन करणाऱ्यांमध्ये ३९ टक्के व्यक्ती या १८ ते २४ या वयोगटातील आहेत. दुर्दैवाची बाब म्हणजे ‘टीनएजर्स’चे प्रमाणदेखील वाढत असल्याची बाब समोर आली आहे. ‘हेल्प एज इंडिया’ या सामाजिक संस्थेच्या २०१५ च्या अहवालातून हे जळजळीत वास्तव समोर आले आहे.
ज्येष्ठांवर होणारा अन्याय व त्यांची छळवणूक यासंदर्भात संस्थेकडून देशभरात सर्वेक्षण करण्यात आले. देशातील २५ ते ४५ वयोगटातील तरुणांशी संवाद साधून दिल्ली, बंगळूरु , मदुराई, चेन्नई, हैदराबाद, कोलकाता, नागपूर, कानपूर, अहमदाबाद आणि मुंबई या १० शहरांमध्ये सर्वेक्षण केले. यानंतर तयार करण्यात आलेल्या अहवालानुसार नागपुरातील ज्येष्ठ नागरिकांशी गैरवर्तन करणाऱ्यांमध्ये १८ ते ३४ या वयोगटातील एकूण ७३.४ टक्के तरुणांचा समावेश आहे.
१८ वर्षांखालील ‘टीनएजर्स’चे प्रमाण १९.५ टक्के असून ही बाब नक्कीच चिंतीत करणारी आहे.
सार्वजनिक ठिकाणी गैरवर्तन वाढीस
जेष्ठ नागरिकांसोबत घरांमध्ये गैरवर्तन करण्यात येतेच. परंतु सार्वजनिक ठिकाणीदेखील त्यांच्याशी उर्मटपणे बोलून किंवा शिवीगाळ करुन त्यांचा अपमान करण्याचे प्रमाण वाढीस लागले आहे. अहवालानुसार छळवणूक सहन करावी लागणाऱ्या जेष्ठ नागरिकांपैकी ४७.५ जणांना घरातूनच त्रास होतो. तर ३१.५ टक्के जेष्ठ नागरिकांना घराबाहेर पडल्यावरदेखील पावलोपावली अपमानाला सामोरे जावे लागत आहे.
एकत्र कुटुंबपद्धती आवश्यक
जेष्ठ नागरिकांची होणारी छळवणूक थांबविण्यासाठी एकत्र कुटुंबपद्धती आवश्यक असल्याचे नागपुरातील ९०.७ टक्के तरुणांचे मत आहे. शिवाय कुटुंबातून यासंदर्भात पुढाकार घेऊन जेष्ठ नागरिकांना मानाचे स्थान देण्याची आवश्यकता आहे. ही स्थिती सुधारायची असेल तर जेष्ठांच्या सल्ल्यांना महत्त्व द्यावे असे मत २३.५ टक्के तरुणांनी व्यक्त केले आहे. तर एकत्र जेवण घेतल्याने अनेक समस्या दूर होऊ शकतात असे २२.५ टक्के तरुणांचे मानणे आहे.