ओल्या-सुक्या कचऱ्यामुळे तीन दिवसाआड कचरागाडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:11 IST2020-12-30T04:11:17+5:302020-12-30T04:11:17+5:30
नागपूर : सुंदर व स्वच्छ शहराच्या वल्गना केल्या जात असताना घराघरातून कचरा उचलण्याची मोहीम ओल्या व सुका कचऱ्यामुळे फसल्याचे ...

ओल्या-सुक्या कचऱ्यामुळे तीन दिवसाआड कचरागाडी
नागपूर : सुंदर व स्वच्छ शहराच्या वल्गना केल्या जात असताना घराघरातून कचरा उचलण्याची मोहीम ओल्या व सुका कचऱ्यामुळे फसल्याचे दिसून येत आहे. नागरिक कचऱ्याचे वर्गीकरण करीत नाहीत. यामुळे कचरागाडीवरील कर्मचाऱ्यावरच लोकांचा कचरा वेगळा करण्याची वेळ आली आहे. यात वेळ जात असल्याने दुसऱ्या वसाहतींमध्ये दोन-तीन दिवसाआड कचऱ्याची गाडी येत आहे. नाइलाजाने लोकांना रस्त्यावर, मोकळ्या जागी कचरा फेकावा लागत आहे.
घराघरातून कचरा गोळा करण्याचे कंत्राट दोन वेगवेगळ्या कंपन्यांना देण्यात आले आहे. झोन क्र. १ ते ५ या वसाहतीमधील कचऱ्याची जबाबदारी ‘एजी एनव्हायरो प्रा.लि.कंपनीला देण्यात आली. नोव्हेंबर २०१९ पासून ही कंपनी कार्यरत आहे. विशेष म्हणजे, मनपाने सुरुवातीला ओला-सुका कचरा वेगळ्या करण्यावर मोठी जनजागृती केली. परंतु कोरोनाच्या काळात याकडे फारसे लक्ष दिले नाही. यामुळे पुन्हा एकत्र कचरा टाकणे सुरू झाले. आता मनपाने यावर आक्षेप घेतला आहे. नागरिक ओला-सुका कचरा वेगळा करून देत नाहीत. यामुळे कंपनीने आपल्या सर्व कचरा गाडीचालकांना लोकांचा कचरा वेगळा करण्याची सक्ती केली. यात बराच वेळ जातो. सकाळी ६.३० वाजेपासून ते दुपारी २ वाजेपर्यंतच्या कामाच्या वेळात एकाच वसाहतीतील कचरा उचलणेही शक्यत होत नसल्याचे चित्र आहे. दोन दिवसांच्यावर वेळ जात असल्याने संबंधित गाडीवर अवलंबून असलेल्या दुसऱ्या वसाहतींमध्ये गाडी जाण्यास तीन ते चार दिवसांचा कालावधी लागत आहे.
-कुकडे ले-आऊटमध्ये तीन दिवसानंतर कचरागाडी
कुकडे ले-आऊट येथील संजय राऊत यांनी सांगितले, नियमित असलेली कचरागाडी मागील आठवड्यापासून अचानक अनियमित झाली. आज तब्बल तीन दिवसानंतर कचरागाडी आली. गाडीतील कर्मचाऱ्यांवर कचऱ्याचा डबा दिल्यावर तो स्वत: ओला आणि सुका कचरा वेगळा करीत असल्याने वेळ लागत होता. कचरा टाकण्यासाठी लाईन लागली होती.
-नवीन बाभुळखेड्यात तीन दिवसापासून कचरागाडीची प्रतीक्षा
नवीन बाभूळखेड्यातील क्रिस्टिना जेम्स यांनी सांगितले, कचरागाडीची वेळ पहाटे ६.३० वाजताची आहे. झोपमोड करून गाडीची वाट पहावी लागते. मागील तीन दिवसांपासून गाडीच आली नाही. घरात कचरा तुंबून दुर्गंधी सुटली आहे. यामुळे नाईलाजेने बाहेर कचरा फेकण्याची वेळ आली.
-लोकांनी ओला-सुका कचरा वेगळा करावा
घरातूनच ओला-सुका वेगळा करण्याचे मागील कित्येक महिन्यांपासून आवाहन केले जात आहे. परंतु अनेक नागरिक याला गंभीरतेने घेत नाहीत. नकार दिल्यास हे लोक रस्त्यावर कचरा टाकतात. यामुळे आमचा कर्मचारी कचऱ्याचे वर्गीकरण करतो. यात वेळ जात आहे. परंतु लवकरच ही समस्या निकाली निघेल.
-विशाल जनबंधू
धंतोली झोन प्रमुख, एजी इनव्हायरो प्रा. लि. कंपनी