वेलडन नागपूरकर : जनता कर्फ्यूचे उत्स्फूर्त पालन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2020 20:04 IST2020-07-25T20:02:21+5:302020-07-25T20:04:41+5:30
कोरोनाच्या वाढत्या संसर्गाची साखळी तोडण्यासाठी शहरात दोन दिवसीय जनता कर्फ्यू जाहीर करण्यात आला आहे. महापौर व मनपा आयुक्त यांच्या आवाहनाला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत जनता कर्फ्यूचे पालन केले.

वेलडन नागपूरकर : जनता कर्फ्यूचे उत्स्फूर्त पालन
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोनाच्या वाढत्या संसर्गाची साखळी तोडण्यासाठी शहरात दोन दिवसीय जनता कर्फ्यू जाहीर करण्यात आला आहे. महापौर व मनपा आयुक्त यांच्या आवाहनाला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत जनता कर्फ्यूचे पालन केले. शनिवारी पहिल्या दिवशी शहरात अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने, कार्यालये, आस्थापने स्वयंस्फूर्तीने बंद होती. सकाळी दुधाचे वितरण सुरळीत झाले. लोकांपर्यंत वृत्तपत्र पोहचले. शहरात ठिकठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त होता. परंतु पोलीस कुणावरही बळजबरी करताना दिसून आले नाही. महापौर संदीप जोशी, पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय हे स्वत: रस्त्यावर होते. ते नागरिकांना जनता कर्फ्यूचे पालन करण्याचे आवाहन करीत होते. एकूणच अपवाद वगळता शहरात जनता कर्फ्यूला नागपूरकरांचा चांगला पाठिंबा मिळाल्याचे चित्र दिसून आले. त्यामुळे पहिल्या दिवशी तरी वेलडन नागपूरकर असेच म्हणावे लागेल.
रविवारी कर्फ्यूला मिळणारा प्रतिसाद तसेच सोमवार ते गुरुवार दरम्यान शिस्त व नियमाचे काटेकोर पालन होते की नाही याचे अवलोकन करून शुक्रवारी पुन्हा लोकप्रतिनिधी आणि अधिकारी यांची बैठक होईल. यात लॉकडाऊन लावायचा की नाही यावर निर्णय घेतला जाईल. नागरिकांनी शिस्त आणि नियमांचे पालन केले तर पुन्हा लॉकडाऊन लागणार नाही, अन्यथा कर्फ्यूसह लॉकडाऊन लागेल, असे संकेत महापौर संदीप जोशी व मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिले आहे, त्यामुळे नागपुरात कठोर लॉकडाऊन लागू द्यायचा नसेल तर नागपूरकरांनी पहिल्या दिवशी दाखवलेली शिस्त व नियमांचे पालन येत्या काही दिवसांपर्यंत तरी कायम ठेवणे आवश्यक आहे.