Maharashtra Assembly Election 2019 : निवडणूक प्रक्रियेदरम्यान शस्त्रबंदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2019 22:56 IST2019-09-24T22:55:59+5:302019-09-24T22:56:51+5:30
नागपूर ग्रामीण जिल्ह्यात २७ ऑक्टोबर २०१९ पर्यंत परवानाप्राप्त अग्निशस्त्रे, हत्यारे, दारूगोळा स्वत:जवळ बाळगण्यास व सोबत वाहून नेण्यास मनाई करण्यात आलेली आहे.

Maharashtra Assembly Election 2019 : निवडणूक प्रक्रियेदरम्यान शस्त्रबंदी
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : विधानसभेची निवडणूक निर्भय, शांततामय, न्याय्य वातावरणात व सुरळीत पार पाडण्याकरिता निवडणूक कालावधीमध्ये शस्त्र अथवा हत्यारे, दारूगोळा याचा गैरवापर होऊन कोणतीही अनुचित घटना घडू नये, मानवी जीवित हानी किंवा सुरक्षिततेला व मालमत्तेला धोका पोहचू नये यासाठी जिल्हा दंडाधिकारी यांनी नागपूर ग्रामीण जिल्ह्यात फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ च्या कलम १४४ अंतर्गत आदेश पारित केलेला असून, नागपूर ग्रामीण जिल्ह्यात २७ ऑक्टोबर २०१९ पर्यंत परवानाप्राप्त अग्निशस्त्रे, हत्यारे, दारूगोळा स्वत:जवळ बाळगण्यास व सोबत वाहून नेण्यास मनाई करण्यात आलेली आहे.
या आदेशातून बंदोबस्तासाठी असणारे अधिकारी, कर्मचारी तसेच बँका व सार्वजनिक मालमत्तेच्या सुरक्षिततेसाठी नेमण्यात आलेले सुरक्षा कर्मचारी यांना वगळण्यात आलेले आहे. परंतु अशा सुरक्षा कर्मचाऱ्याकडून निवडणूक कालावधीमध्ये त्यांच्याकडील शस्त्रांचा गैरवापर होणार नाही, याची संपूर्ण जबाबदारी संबंधित बँक, संस्थेच्या अधिकाऱ्यांवर सोपविण्यात आलेली आहे. तसेच छाननी समितीच्या १४ सप्टेंबर २०१९ रोजीच्या सभेत ज्या परवानाधारक व्यक्तींना निवडणूक कालावधीत स्वत:जवळ शस्त्र बाळगण्याची, वाहून नेण्याची अत्यंत आवश्यकता असेल अशाच व्यक्तींनी आदेश निर्गमित झाल्यापासून १० दिवसांचे आत जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी, नागपूर यांच्यासमक्ष विनंती अर्ज दाखल करण्याची मुभा देण्यात आलेली आहे, असे अतिरिक्त जिल्हा दंडाधिकारी, नागपूर यांनी कळविले आहे.