'आदिवासींच्या जल, जंगल, जमीन आणि संस्कृतीचे रक्षण करू' मुख्यमंत्र्यांनी दिले आश्वासन
By आनंद डेकाटे | Updated: November 15, 2025 18:41 IST2025-11-15T18:40:05+5:302025-11-15T18:41:20+5:30
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : राज्यस्तरीय आदिवासी सांस्कृतिक महोत्सव

'We will protect the water, forest, land and culture of the tribals', the Chief Minister assured
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राज्य शासन प्रत्येक आदिवासींना वन जमीन पट्टा देत आहे व त्यांच्या संस्कृतीचे रक्षण करीत आहे. आदिवासींच्या कल्याणासाठी राज्य शासन आदिवासी विकास विभागाच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहे. जनजाती वर्षाच्या निमित्ताने राज्य शासन भगवान बिरसा मुंडा यांनी दिलेल्या शिकवणीनुसार आदिवासींच्या जल, जंगल आणि जमीन व संस्कृतीचे रक्षण करेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे व्यक्त केला.
आदिवासी विकास विभागाच्या वतीने भगवान बिरसा मुंडा यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त व जनजातीय गौरव वर्षांतर्गत मानकापूर येथील विभागीय क्रीडा संकुलात राज्यस्तरीय आदिवासी सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाचे उद्घाटन शनिवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आणि केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. त्यावेळी फडणवीस बोलत होते. महसूलमंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके, विभागाचे राज्यमंत्री इंद्रनील नाईक, मुख्य सचिव राजेश कुमार, आदिवासी विकास विभागाचे सचिव विजय वाघमारे यावेळी उपस्थित होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, भगवान बिरसा मुंडा यांच्या १५० व्या जयंती वर्षानिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ‘जनजातीय वर्ष’ म्हणून साजरे करण्याचा निर्णय घेतला आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने पंतप्रधानांनी देशातील आदिवासी जननायकांचे चरित्र जनतेसमोर आणण्याचे तसेच त्यांचे स्मारके उभारण्याचा कार्यक्रम दिला आहे. राज्य शासनानेही राज्यातील आदिवासी नायकांचा गौरवशाली इतिहास पुस्तक रूपाने जनतेसमोर आणला आहे. विविध योजनांद्वारे आदिवासी समाजाचा विकास साधण्यात येत आहे. राज्यातील आदिवासी आश्रम शाळांचा दर्जा सुधारला आहे. आदिवासी मुलांच्या शिक्षणासाठी स्वयम् योजना राबविण्यात येत आहे. एकही आदिवासी मुलगा शिक्षणापासून वंचित राहू नये. यासाठी राज्य शासन प्रयत्नशील असल्याचे ते म्हणाले.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले, देशाच्या विकासात आदिवासी समाजाचे मोठे योगदान आहे. भगवान बिरसा मुंडा हे या समाजाच्या अभिमान व स्वाभिमानाचे प्रतिक आहे. निसर्गाच्या सानिध्यात राहून आपली समृद्ध परंपरा जपण्याचे कार्य हा समाज करीत असून त्यांच्या सर्वांगिक विकासाठी संकल्प करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. विजय वाघमारे यांनी प्रास्ताविक केले तर दीपा मुधोळ मुंडे यांनी आभार मानले.
आदिवासी महिला हातायेत लखपती दीदी - डाॅ. अशोक ऊईके
आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांनी सांगितले की, एप्रिल महिन्यापासून भगवान बिरसा मुंडा यांच्या १५० व्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर आदिवासी विकास विभागाच्या वतीने भगवान बिरसा सांस्कृतिक मंचाची स्थापना केली. याद्वारे ४० हजार युवा-युवतींची नोंदणी व विविध सांस्कृतिक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. यासोबतच राणी दुर्गावती योजनेच्या माध्यमातून आदिवासी महिला लखपती दीदी होत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ऑनलाइन भूमिपूजन व लोकार्पण
सुराबर्डी, नागपूर येथील गोंडवाना आदिवासी सांस्कृतिक संग्रहालय तथा आदिवासी संशोधन व प्रशिक्षण उपकेंद्राचे भूमिपूजन, शासकीय आश्रमशाळा, घानवळ, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, जव्हार, जि. पालघर येथील इमारतीचे लोकार्पण, शासकीय आश्रमशाळा पळसुंडा, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प जव्हार, जि. पालघर येथील प्रयोगशाळा इमारतीचे लोकार्पण. शासकीय आश्रमशाळा, देवगाव, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, नाशिक येथील संकुलात मुलींच्या वसतिगृहाचे लोकार्पण मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते दूरदृष्यप्रणालीद्वारे यावेळी करण्यात आले.
आदिवासी विभागाच्या वतीने आयोजित विविध सांस्कृतिक स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा गौरवही त्यांच्या हस्ते करण्यात आला. तत्पूर्वी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 'भगवान बिरसा मुंडा यांच्या जीवनकार्यावर आधारित चित्रमय पुस्तका'चे आणि 'आदिवासी परंपरा व सर्जनशिलता' यावर आधारित कॉफीटेबल बुकचे प्रकाशन झाले. आमदार सर्वश्री रविंद्र चव्हाण, डॉ. आशिष देशमुख, माजी केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार यांचीही यावेळी उपस्थिती होती.