आम्ही भाजीपाला फेकला नाही

By Admin | Updated: June 12, 2017 02:23 IST2017-06-12T02:23:55+5:302017-06-12T02:23:55+5:30

शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी आम्हीही आंदोलने केलीत, परंतु आंदोलनाच्या काळात आम्ही दूध किंवा भाजीपाला रस्त्यावर फेकला नाही.

We did not throw the vegetable | आम्ही भाजीपाला फेकला नाही

आम्ही भाजीपाला फेकला नाही

हंसराज अहीर : सावनेर येथे ‘सबका साथ, सबका विकास’ कार्यक्रम
लोकमत न्यूज नेटवर्क
सावनेर : शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी आम्हीही आंदोलने केलीत, परंतु आंदोलनाच्या काळात आम्ही दूध किंवा भाजीपाला रस्त्यावर फेकला नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात सरकार चांगले कार्य करीत आहे. मेक इन इंडिया, स्किल डेव्हलपमेंट, जनधन, उज्ज्वला या योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांसह गरिबांना चांगले दिवस येणार आहेत, असे प्रतिपादन केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केले.
केंद्र शासनाने तीन वर्षांत केलेल्या कार्याची माहिती देण्यासाठी सावनेर येथील श्रीकृष्ण सभागृहात रविवारी दुपारी ‘सबका साथ, सबका विकास’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यात अध्यक्षीय भाषणातून ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून राज्याचे ऊर्जा तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, खा. कृपाल तुमाने, आ. सुनील केदार, वेकोलिचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक राजीव रंजन मिश्रा, संजय कुमार, टी. एन. झा, भाजपचे जिल्हाध्यक्ष डॉ. राजीव पोतदार, सोनबा मुसळे, अरुण सिंह, दादाराव मंगळे, नितीन राठी, विजय देशमुख, किशोर मुसळे उपस्थित होते.
हंसराज अहीर म्हणाले, नरेंद्र मोदी सरकारच्या काळात कोळशाच्या उत्पादनात वाढ झाली. पूर्वी कोळशाचे ३७ मिलियन टन उत्पादन व्हायचे. आता ते ४७ मिलियन टनावर गेले आहे. भविष्यात हे उत्पादन ६५ मिलियन टनावर जाईल. हे उत्पादन लक्षात घेता देशाला आगामी ५०० वर्षे कोळशाची कमतरता भासणार नाही, असा दावाही त्यांनी केला. सिंचनासाठी ८५ कोटी रुपये उपलब्ध करून देण्यात आल्याने सिंचनाचे क्षेत्र वाढले आहे. देशातील काळाबाजार थांबला आहे. वस्तूंच्या किमती स्थिर केल्या आहेत. विजेचे दर कमी करण्यात आल्याने महाराष्ट्रात सिंचनाचे क्षेत्र वाढले आहे, असेही अहीर यांनी सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी परदेशात मजा करायला जात नसून ते विदेशातील मोठे उद्योग आपल्या देशात आणण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. यातून रोजगार निर्मिती होणार असून, बेरोजगारी दूर होणार आहे. शिवाय, तरुणांना कौशल्य विकासाचे प्रशिक्षण दिले जात असल्याने स्वयंरोजगाराला चालना मिळाली आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, खा. कृपाल तुमाने, आ. सुनील केदार, डॉ. राजीव पोतदार यांचीही भाषणे झाली. राजीव रंजन मिश्रा यांनी प्रास्ताविक केले तर, अ‍ॅड. प्रकाश टेकाडे यांनी संचालन केले. वेकोलिचे क्षेत्रीय महाप्रबंधक डी. एम. गोखले यांनी आभार मानले. कार्यक्रमाला भाजप कार्यकर्त्यांसह नागरिक उपस्थित होते.

तीन लाख वीज कनेक्शन दिले - पालकमंत्री
सध्या विदर्भ व मराठवाड्यातील उद्योगांना छत्तीसगडप्रमाणे कमी दरात वीज मिळत आहे. शिवाय, तीन लाख शेतकऱ्यांना कृषिपंपासाठी नवीन कनेक्शन देण्यात आले आहेत. त्यामुळे या शेतकऱ्यांना किमान दोन पिके घेणे शक्य झाले आहे. पूर्वी सौर वीज १६ रुपये प्रतियुनिट होती. आता हे दर २.५० रुपये प्रतियुनिट करण्यात आले आहेत. भविष्यात शेतकऱ्यांना २.८० रुपये प्रतियुनिट दराप्रमाणे २४ तास वीज उपलब्ध होणार आहे, असेही पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावेळी सांगितले.

Web Title: We did not throw the vegetable

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.