नागपूरसाठी १० हजार रेमडेसिविरच्या पुरवठ्याची प्रतीक्षा कायमच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 07:00 IST2021-04-21T07:00:00+5:302021-04-21T07:00:11+5:30
Coronavirus in Nagpur नागपूरसाठी सोमवारी रात्री ८ वाजेपर्यंत १० हजार रेमडेसिविर इंजेक्शनचा पुरवठा करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने देऊनही मंगळवारी रात्री ९ वाजतानंतरही प्रतीक्षा कायमच आहे.

नागपूरसाठी १० हजार रेमडेसिविरच्या पुरवठ्याची प्रतीक्षा कायमच
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूरसाठी सोमवारी रात्री ८ वाजेपर्यंत १० हजार रेमडेसिविर इंजेक्शनचा पुरवठा करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने देऊनही मंगळवारी रात्री ९ वाजतानंतरही प्रतीक्षा कायमच आहे. तथापि, सोमवारी रात्री ८ वाजता जिल्हा प्रशासनाला ४,२१३ रेमडेसिविर मिळाले. ते रात्री ११ वाजेपर्यंत वाटपही झाल्याची माहिती आहे.
या संदर्भात प्रशासनाकडे विचारणा केली असता निवासी उपजिल्हाधिकारी कातडे म्हणाले, सोमवारी रात्री ८ वाजता ४,२१३ इंजेक्शनचा साठा आला होता. तो रात्री ११ वाजेपर्यंत रुग्णालयांना वितरित केला. सर्व रुग्णालयांच्या मागणीचा विचार करून तेथील रुग्णसंख्येच्या ६० टक्के प्रमाणात हे वितरण करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
नागपुरातील गंभीर परिस्थिती लक्षात घेता येथे १० हजार इंजेक्शन देण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. मात्र नागपूरसाठी तेवढे इंजेक्शन मिळालेच नाही. मंगळवारी रात्री उशिरापर्यंत साठा येण्याची शक्यता नसल्याचे प्रशासनाच्या सूत्रांनी सांगितले. या संदर्भात अधिक माहितीसाठी जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र ते उपलब्ध होऊ शकले नाहीत.
रुग्णालयांपुढे समस्या
मागणीच्या तुलनेत फक्त ६० टक्के रेमडेसिविर मिळाल्याने रुग्णालयांसमोर संकट कायम आहे. रुग्णांचे नातेवाईक आपल्या रुग्णाला इंजेक्शन मिळाले का, याची चौकशी करीत असून इंजेक्शनसाठी भटकत असल्याचे चित्र कायमच आहे. एकीकडे औषधांच्या दुकानामधून विक्रीला बंदी, दुसरीकडे पुरेसा साठा नाही, तर तिसरीकडे इंजेक्शनचा काळाबाजार अशी स्थिती आहे. पूर्ण साठा न मिळाल्याने रुग्णालयांसमोरही समस्या कायम आहे.
पालकमंत्री म्हणातात, ७०० इंजेक्शनचा पुरवठा
मिळालेल्या ४,२१३ औषधांचे वाटप झाल्याचे प्रशासन सांगत असताना पालकमंत्री नितीन राऊत यांनी जिल्ह्यात ७०० इंजेक्शनचा पुरवठा झाल्याचे सांगितले आहे. मोजक्या कंपन्या हे उत्पादन करीत असल्याने नागपुरात होणाऱ्या पुरवठ्यावर परिणाम झाल्याचे त्यांनी म्हटले आहे.
...