नागपूर जिल्ह्यातील पाणीटंचाईबरोबर जलस्रोतही दूषित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2018 22:47 IST2018-03-30T22:47:19+5:302018-03-30T22:47:30+5:30
मार्च महिना संपत आलाय आणि ग्रामीण भागात पाणी टंचाईला सुरुवात झाली आहे. काही भागात पाणी टंचाई बरोबरच दूषित पाण्याचा पुरवठाही होत आहे. खुद्द प्रशासनाने केलेल्या सर्वेक्षणात जिल्ह्यातील ८९ ग्रामपंचायतीला दूषित पाण्यासाठी पिवळे कार्ड दिले आहे. या ग्रा.पं.मधील १४३ पाणी पुरवठा करणारे जलस्रोत दूषित आढळले आहेत.

नागपूर जिल्ह्यातील पाणीटंचाईबरोबर जलस्रोतही दूषित
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मार्च महिना संपत आलाय आणि ग्रामीण भागात पाणी टंचाईला सुरुवात झाली आहे. काही भागात पाणी टंचाई बरोबरच दूषित पाण्याचा पुरवठाही होत आहे. खुद्द प्रशासनाने केलेल्या सर्वेक्षणात जिल्ह्यातील ८९ ग्रामपंचायतीला दूषित पाण्यासाठी पिवळे कार्ड दिले आहे. या ग्रा.पं.मधील १४३ पाणी पुरवठा करणारे जलस्रोत दूषित आढळले आहेत.
धरणातील पाणीसाठा कमी असल्याने यंदाच्या उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. ग्रामीण भागात ही परिस्थिती शहराच्या तुलनेत अधिक भयावय होणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. मार्च महिन्यातच पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. धरणातील पाणीसाठा कमी झाला आहे. त्यामुळे अनेक भागातील पाण्याला कपात करण्यात येणार आहे. सिंचनाला देण्यात येणाऱ्या पाण्यातही कपात करण्यात आली आहे. शेतकऱ्यांकडून याचा विरोध होत आहे. शहरातील पाणीपुरवठ्यालाही कपातीचा फटका बसणार आहे. शहरात अतिरिक्त पाण्याची मागणी होत आहे. त्यामुळे पाणीपुरवठ्याचे स्रोत सुस्थितीत ठेवणे आवश्यक आहे. आॅक्टोबर २०१७ मध्ये करण्यात आलेल्या सर्वेक्षणात जलस्रोत दूषित असलेल्या गावांच्या संख्येत वाढ झाल्याचे दिसत आहे. जिल्हा परिषदेचा पाणीपुरवठा विभाग आणि ग्रामसेवकांकडून या जलस्रोतांची योग्य दक्षता घेण्यात येत नाही आहे. त्यामुळे जलस्रोत दूषित होत असल्याचे निदर्शनास आले आहे. पावसाळ्यापूर्वी व पावसाळ्यानंतर जलस्रोतांची तपासणी करण्यात येत आहे. जलस्रोत सुस्थितीत ठेवण्यासाठी दरवर्षी कोट्यावधी रुपये खर्च करण्यात येते. दरवर्षी नवीन बोअरवेल, नळ लाईन टाकण्यात येते. त्यानंतरही जलस्रोत दूषित होतो. त्यामुळे हा पैसा जातो कुठे, असाच प्रश्न उपस्थित होत आहे. जलस्रोत योग्य ठेवण्याची जबाबदारी ग्रामसेवकांची आहे. ती त्यांनी योग्यपद्धतीने पार पाडली पाहिजे. ब्लिचिंग पावडरचा वापर करावा. नागरिकांचे आरोग्यावर परिणाम झाल्यास संबंधित ग्रामसचिवांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा आरोग्य समितीचे सभापती व उपाध्यक्ष शरद डोणेकर यांनी दिला आहे.
पिवळे कार्ड दिलेल्या ग्रामपंचायती व जलस्रोत
तालुका ग्रामपंचायत संख्या जलस्रोत संख्या
कुही १४ २२
मौदा ३ ५
रामटेक ४ ४
काटोल ८ १९
कळमेश्वर ३ ६
कामठी ५ ५
नरखेड १० १३
नागपूर ग्रा. ३ ६
भिवापूर १० १४
पारशिवानी ११ १८
उमरेड १३ २०
सावनेर ३ ९
हिंगणा २ २