२०२४ पर्यंत नागपूर जिल्ह्यातील प्रत्येक घराला पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2020 22:33 IST2020-12-21T22:32:16+5:302020-12-21T22:33:57+5:30
Jal Jivan Mission, nagpur news प्रत्येक घरापर्यंत पाणीपुरवठा व्हावा, या उद्देशाने शासन ‘हर घर नल’ हा उपक्रम राबवीत आहे. जल जीवन मिशनअंतर्गत सन २०२० ते २०२४ पर्यंत ग्रामीण भागातील कुटुंबांना नळ जोडणीद्वारे पिण्याचे पाणी उपलब्ध करण्यात येणार आहे.

२०२४ पर्यंत नागपूर जिल्ह्यातील प्रत्येक घराला पाणी
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : प्रत्येक घरापर्यंत पाणीपुरवठा व्हावा, या उद्देशाने शासन ‘हर घर नल’ हा उपक्रम राबवीत आहे. जल जीवन मिशनअंतर्गत सन २०२० ते २०२४ पर्यंत ग्रामीण भागातील कुटुंबांना नळ जोडणीद्वारे पिण्याचे पाणी उपलब्ध करण्यात येणार आहे. यावर्षी जिल्ह्याला ९१,६०४ नळ जोडणीचे टार्गेट दिले होते. आतापर्यंत ९२.२९ टक्के कामे पूर्ण झाली आहेत. या अभियानांतर्गत २०२४ मध्ये प्रत्येक घराला पाणीपुरवठा करण्याचा दावा प्रशासनाने केला आहे.
सर्वप्रथम तहानलेल्या गावांसाठी कायमस्वरूपी पाणीपुरवठा उपाययोजना कार्यान्वित करण्यात येणार आहे. यामध्ये प्रतिदिन प्रतिमाणसी किमान ५५ लिटर याप्रमाणे पाण्याची उपलब्धता करणे अपेक्षित आहे. यापूर्वी अस्तित्वात असणाऱ्या ४० लिटरप्रमाणे पाणी उपलब्ध असणाऱ्या जुन्या योजना यामध्ये परिवर्तित होणार आहेत. ही योजना लागू होण्यापूर्वी जिल्ह्यातील ३ लाख ६५ हजार ४१९ लाभधारक कुटुंबांपैकी १ लाख ५४ हजार १९० कुटुंबाकडे वैयक्तिक नळ जोडणी असल्याने २ लाख ११ हजार २२९ कुटुंबाला ही नळ जोडणी देण्याचे उद्दिष्ट होते. मे महिन्यापासून कामाला सुरुवात झाली असून, ८४ हजार ५३८ नळ जोडणी व त्यांच्या नोंदणीचे काम पूर्ण झाले आहे.
नागपूर(ग्रा.)मध्ये सर्वाधिक कामे
वैयक्तिक नळ जोडणीचे सर्वाधिक काम नागपूर ग्रामीण तालुक्यात १६७.८३ टक्के झाले आहे. त्यापाठोपाठ मौदा व कामठी तालुक्यात उद्दिष्टापेक्षा कामे झाली आहेत. तर कुही, भिवापूर, कळमेश्वरात ५० टक्क्यापेक्षा कमी कामे झाली आहेत.