विधानभवन परिसरात फिरणाऱ्या दलालांवर ‘वॉच’ बिनकामाच्या लोकांना चाप, घेतली जात आहे गुप्त माहिती
By यदू जोशी | Updated: December 10, 2025 06:27 IST2025-12-10T06:26:47+5:302025-12-10T06:27:12+5:30
अधिवेशन सुरू झाले की, अशा लोकांचा विधानभवनात राबता सुरू होतो. वेगवेगळ्या मंत्र्यांकडे जाऊन आपल्या कामाचे ‘सेटिंग’ ते करत असतात. वारंवार तीच माणसे विधानभवन परिसरात कशासाठी येतात? याची गुप्त माहिती आता घेतली जाणार आहे.

विधानभवन परिसरात फिरणाऱ्या दलालांवर ‘वॉच’ बिनकामाच्या लोकांना चाप, घेतली जात आहे गुप्त माहिती
यदु जोशी
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : विधानभवन परिसरात आपली वा इतर कोणाची ‘अर्थपूर्ण’ कामे घेऊन येणारे दलाल रडारवर आले आहेत. सातत्याने असा संशयास्पद वावर असलेल्यांवर विशेष नजर ठेवणे, त्यांना कोणी पास दिला याची माहिती घेणे, त्यांचा विधानभवन परिसरात येण्यामागचा उद्देश तपासणे, अशी कार्यवाही गुप्तपणे सुरू करण्यात आली आहे. विधानमंडळाच्या खात्रीलायक सूत्रांनी ही माहिती दिली.
अधिवेशन सुरू झाले की, अशा लोकांचा विधानभवनात राबता सुरू होतो. वेगवेगळ्या मंत्र्यांकडे जाऊन आपल्या कामाचे ‘सेटिंग’ ते करत असतात. वारंवार तीच माणसे विधानभवन परिसरात कशासाठी येतात? याची गुप्त माहिती आता घेतली जाणार आहे. त्यासाठीचे निर्देश विधानभवनच्या सुरक्षा यंत्रणेला देण्यात आल्याची माहिती आहे. अशा दलालांच्या संशयास्पद हालचाली टिपून त्याची माहिती पीठासिन अधिकाऱ्यांना सुरक्षा यंत्रणेकडून दिली जाणार आहे.
परिपत्रकात काय आहे?
कोणतेही अधिकृत शासकीय काम नसताना हौसेखातर किंवा स्वत:ची खासगी कामे करवून घेण्यासाठी विधानभवनाचा पास मिळवून फिरणाऱ्यांना चाप बसविण्यात आला आहे. खासगी अभ्यागतांसाठी संपूर्ण अधिवेशन कालावधीचा किंवा दैनंदिनही प्रवेश पास दिला जाणार नाही, असे विधानमंडळ सचिवालयाने काढलेल्या परिपत्रकात म्हटले आहे.
आत्यंतिक अपवादात्मक परिस्थितीत खासगी अभ्यागतांसाठी पास देणे अत्यावश्यक झाल्यास विधान परिषद सभापती वा विधानसभा अध्यक्षांची लेखी परवानगी घ्यावी लागणार आहे. अधिवेशनात सोमवारपासूनच लोकांची गर्दी उसळली आहे. त्यात राजकीय पक्षांचे कार्यकर्ते, ‘कामे’ करवून घेण्यासाठी फिरणारे लोकही दिसत आहेत. अशांना चाप लावण्यासाठी काढलेल्या या परिपत्रकाची कितपत प्रभावी अंमलबजावणी होणार या बाबत शंका व्यक्त केली जात आहे.
पीठासिन अधिकारी, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते यांच्या कार्यालयासाठी यापूर्वी मागणीप्रमाणे संपूर्ण अधिवेशनासाठी वा दैनंदिन पास दिला आतापर्यंत दिले जात होते. मात्र आता या अधिवेशनापासून पीठासिन अधिकारी वा त्यांनी या कामी नियुक्त केलेल्या त्यांच्या कार्यालयातील अधिकाऱ्यांची लेखी शिफारस आवश्यक असेल.
फुके, टिळेकरांसह ३० आमदारांनी विनापास माणसे घुसवली
प्रवेश पास नसलेल्यांना विधानभवन परिसरात आमदारच आणत असल्याची धक्कादायक बाब समोर आली. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सोमवारी तब्बल ३० आमदारांनी त्यांच्यासोबत पास नसलेल्यांना आणले. असे करणाऱ्यांमध्ये माजी विरोधी पक्षनेते, काही राज्यमंत्री आणि आमदारही होते, असे सभापती प्रा. राम शिंदे यांनी विधानभवन सुरक्षा अधिकाऱ्यांनी दिलेल्या अहवालाच्या आधारे सांगितले. आ. परिणय फुके आणि आ. योगेश टिळेकर यांचे नाव घेत शिंदे यांनी याबाबत खबरदारी घ्या, अशा कानपिचक्या दिल्या.
अध्यक्षांची आमदारांना समज
विधानसभेत अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी लोकांना विनापास विधानभवन परिसरात आमदार आणत आहेत, ही बाब गंभीर असल्याचे सांगितले. सुरक्षा अधिकाऱ्यांनी आपल्याकडे या आमदारांची नावे पाठविलेली आहेत. त्यांची नावे जाहीर करणे मला उचित वाटत नाही, पण असेच सुरू राहिले तर आपल्याला या आमदारांची नावे सभागृहात जाहीर करावी लागतील, अशी समज नार्वेकर यांनी दिली. विधानभवन परिसरात येण्यासाठीचे पास विकले जात असल्याचा आरोप मुंबईतील पावसाळी अधिवेशन काळात झाला होता. विधानसभेत त्याचे पडसाददेखील उमटले होते. काही व्यक्ती अशा पासची विक्री पाच ते दहा हजार रुपयांत करत असल्याचा आरोपदेखील झाला होता.