नागपुरात मेट्रो रेल्वेची धुलाई केवळ तीन मिनिटांत!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2019 23:02 IST2019-12-20T23:01:05+5:302019-12-20T23:02:15+5:30
मिहान येथील डेपोचे महत्त्वाचे बांधकाम पूर्ण झाले असून त्या इमारतींचा वापर सुरू झालेला आहे. डेपोमध्ये अत्याधुनिक उपकरणांचा उपयोग करण्यात येत आहे. केवळ तीन मिनिटांत संपूर्ण मेट्रो रेल्वे धुलाईची यंत्रणा डेपोमध्ये आहे.

नागपुरात मेट्रो रेल्वेची धुलाई केवळ तीन मिनिटांत!
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मिहान येथील डेपोचे महत्त्वाचे बांधकाम पूर्ण झाले असून त्या इमारतींचा वापर सुरू झालेला आहे. मिहान डेपोमध्ये मुख्य इमारतीचा आकार ६७०० चौरस मीटर असून या इमारतीचे बांधकाम जलदगतीने सुरू आहे. डेपोमध्ये अत्याधुनिक उपकरणांचा उपयोग करण्यात येत आहे. केवळ तीन मिनिटांत संपूर्ण मेट्रो रेल्वे धुलाईची यंत्रणा डेपोमध्ये आहे.
येथे पिट व्हील लेथ मशीन, ऑटोमॅटिक ट्रेन वॉश प्रकल्प, ईटीयू (इंजिनिअरिंग ट्रेन युनिट), इंटर्नल क्लिनिंग, मेंटनन्स बिल्डिंग, टर्न टेबल अशा इमारती आहेत. मेट्रो रेल्वेच्या (रोलिंग स्टॉक) चाकांची कमी वेळेत देखरेख करण्यासाठी पिट व्हील लेथ हे आधुनिक मशीन मिहान डेपो येथे स्थापन करण्यात आले आहे. अत्याधुनिक पद्धतीने ऑपरेटरच्या साहाय्याने मशीन हाताळली जाते. ही मशीन जर्मनीहून मागविली आहे. तिचे कार्य सुरू आहे.
डेपोमध्ये स्वयंचलित ट्रेन वॉश प्रकल्प स्थापन केला आहे. प्रवासी सेवेच्या आधी आणि नंतर दररोज रेल्वे स्वच्छ धुण्यासाठी वापर केला जातो. रेल्वेच्या दोन्ही बाजू तसेच अंतर्गत बोगी धुण्यासाठी डिझाईन केलेले आहे. रेल्वे पीएलसी प्रोग्राम केलेल्या नियंत्रण पॅनेलद्वारे आपोआप धुतली जाते. हा प्रकल्प फोटो इलेक्ट्रिक सेन्सरने सुसज्ज आहे.त्यामुळे पाणी आणि ऊर्जेची बचत होते. मशीन अवघ्या तीन मिनिटांत संपूर्ण रेल्वे धुऊ शकते. प्रकल्प स्वयंचलित आहे. याव्यतिरिक्त बोगीची योग्य देखभाल करण्यासाठी इनबिल्ट मॅन्युअल मोडचा वापर केला जाऊ शकतो. प्रकल्पाची रिसायकलिंग व्यवस्था आहे आणि पाण्याच्या गुणवत्तेनुसार १०० टक्के पाण्याचा पुनर्वापर करता येते. प्रकल्प आपातकालीन स्टॉप आणि वेग नियंत्रण यासारख्या सुरक्षा वैशिष्ट्यांसह सुसज्ज आहे. ईटीयू (इंजिनिअरिंग ट्रेन युनिट) येथे ट्रेनच्या अंडरफ्लोअरची चाचणी करण्यात येते.