नागपूर: येत्या २४ ते ४८ तासात चंद्रपूर व गडचिराेलीसह विदर्भात जाेरदार ते अतिजाेरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. विभागाने याबाबत ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. पूर्व विदर्भात दाेन दिवस शांत राहिलेले ढग मुसळधार बरसण्याची शक्यता आहे.
ईशान्य अरबी समुद्रात सध्या कुंड तयार झाला आहे, जाे पश्चिम बंगालमध्ये गंगेच्या खाेऱ्यात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याकडे सरकत आहे. तिथून उत्तर गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड व झारखंड हाेत दक्षिणेकडे सरकत आहे. या प्रभावानेच ७ जुलै राेजी चंद्रपूर, गडचिराेली व गाेंदियात अत्याधिक जाेराचा पाऊस हाेईल, असा वेधशाळेचा अंदाज आहे. याशिवाय नागपूर, भंडारा, वर्धा व अमरावती जिल्ह्यात अतिजाेरदार पावसाची शक्यताही वर्तविण्यात आली आहे. त्यानंतर ८ जुलै राेजी नागपूर, अमरावती, चंद्रपूर, गडचिराेली या जिल्ह्यात अतिजाेरदार पावसाचे सत्र कायम राहिल, असा हवामान विभागाचा अंदाज आहे. साेबत विजा व ढगांचा जाेरात गडगडाट हाेण्याचीही शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचा इशारा वेधशाळेने दिला आहे.
दरम्यान पूर्व विदर्भात दाेन दिवस ढग शांत राहिले. चंद्रपूरला रविवारी सकाळपर्यंत पावसाच्या जाेरदार सरी बरसल्या. गाेंदिया जिल्ह्यात तुरळक पावसाची हजेरी लागली. नागपूर, वर्धा, भंडारा, गडचिराेली भागात हलकी रिपरिप झाली. पश्चिम विदर्भात मात्र चांगल्या सरी बरसल्या. रात्री अकाेला ३० मि.मी.. अमरावती १०.६ मि.मी.. यवतमाळ १५.५ मि.मी. चांगला पाऊस झाला. यवतमाळला रविवारी दिवसाही १८ मि.मी. पावसाची नाेंद झाली. बुलढाणा जिल्ह्यातही २१ मि.मी. नाेंदीसह जाेरात पाऊस झाला.