नागपूरसह चार जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा : वादळी पाऊस, गारपिटीची शक्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 00:06 IST2021-03-18T00:05:01+5:302021-03-18T00:06:01+5:30
Chance of heavy rain and hail नागपूरच्या प्रादेशिक हवामान केंद्राने नागपूरसह वर्धा, भंडारा आणि गोंदिया या चार ठिकाणी सतर्कतेचा इशारा दिला आहे.

नागपूरसह चार जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा : वादळी पाऊस, गारपिटीची शक्यता
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूरच्या प्रादेशिक हवामान केंद्राने नागपूरसह वर्धा, भंडारा आणि गोंदिया या चार ठिकाणी सतर्कतेचा इशारा दिला आहे. येत्या चार दिवसात विदर्भात पावसाची शक्यता वर्तविण्यात आली असून, १९ मार्चला वादळी वाऱ्यासह पाऊस, गारपीट आणि विजेची शक्यता वर्तविली आहे. हे वादळ ३० ते ४० किलोमीटर प्रतितास वेगाचे असेल, असे म्हटले आहे.
हवामान विभागाने जारी केलेल्या दैनंदिन प्रसारणातील माहितीमध्ये १९ तारीख सतर्कतेचा इशारा देणाऱ्या ऑरेंज रंगात दर्शविली आहे. नागरिकांना आणि शेतकऱ्यांना सावधगिरीच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
विदर्भातील जिल्ह्यांमध्ये १७ मार्चपासूनच वातावरण बदलाचा इशारा देण्यात आला आहे. नागपूर, भंडारा, गोंदिया आणि चंद्रपूर जिल्ह्यात या दिवशी काही ठिकाणी तुरळक पावसाची शक्यता वर्तविली आहे. १८ तारखेलाही हीच परिस्थिती राहणार असून, वर्धा आणि गडचिरोली जिल्ह्यातही या दिवशी इशारा देण्यात आला आहे. तर २० तारखेला चंद्रपूर आणि गडचिरोली या दोन जिल्ह्यात पावसाचा इशारा देण्यात आला आहे.