व्हीव्हीआयपींना नागपूर विमानतळावर हवे त्यावेळी उतरता येणार नाही
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2024 14:45 IST2024-12-12T14:41:20+5:302024-12-12T14:45:43+5:30
धावपट्टीच्या रिकार्पेटिंगचे काम सुरू : सकाळी १० ते ६ दरम्यान बंद

VVIPs will not be able to disembark at Nagpur airport at any time
वसीम कुरेशी
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : उपराजधानीत विधानसभेचे हिवाळी अधिवेशन सुरू होण्यास आता चार दिवस शिल्लक आहेत. या आठवड्याच्या अखेरीस आमदार, मंत्री आणि अधिकारी नागपुरात येतील. यातील अनेकजण विमानानेच नागपुरात पोहोचतील. सध्या विमानतळावर उशिरा का होईना, धावपट्टीच्या रिकार्पेटिंगचे काम सुरू आहे. त्यामुळे व्हीव्हीआयपी चार्टर विमानाने आले तरी त्यांना अपेक्षित वेळी नागपुरात उतरता येणार नाही.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धावपट्टीच्या रिकार्पेटिंगचे (दुरुस्ती) काम २४ नोव्हेंबरपासून सुरू झाले आहे. कंत्राटदार कंपनीने ऑक्टोबरमध्ये प्रकल्प बसविला आहे. गेल्या महिन्यापासून धावपट्टी सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत म्हणजेच एकूण आठ तासांसाठी संचालनार्थ बंद ठेवण्यात येत आहे. विधानसभा निवडणुकीच्या काळात व्हीव्हीआयपींच्या येण्यामुळे धावपट्टीच्या रिकार्पेटिंगचे काम रखडले होते. नागपूर विमानतळ धावपट्टीच्या रिकार्पेटिंगबाबत उच्च न्यायालयाने स्वतःहून जनहित याचिका दाखल केली होती. या कामाला आधीच विलंब झाला असून आता काम वेळेत पूर्ण करण्याचा दबाव आहे.
... तर उद्भवू शकतात समस्या
नागपूर विमानतळावरून दररोज चालणाऱ्या सुमारे ४० विमानांच्या वेळा बदलण्यात आल्या असून त्या संध्याकाळी ६ नंतर आणि सकाळी १० वाजेपर्यंत मर्यादित करण्यात आल्या आहेत. दरम्यान, चार्टर विमानांना या वेळेत लैंडिंगसाठी प्रतीक्षा करावी लागू शकते. याशिवाय, व्हीव्हीआयपींच्या चार्टरमुळे नियोजित उड्डाणेदेखील काही मिनिटे आकाशात घिरट्या घालू शकतात, असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.
दृष्टिक्षेपात
हे काम एप्रिल-मार्च २०२३ मध्ये सुरू होऊन सहा महिन्यांत पूर्ण होणार होते. लोकसभा निवडणुकीच्या काळात मार्च-एप्रिल २०२४ मध्ये काम सुरू करण्याचा प्रयत्न झाला, मात्र काम होऊ शकले नाही. यापूर्वी, जुलै २०१३-१४ मध्ये धावपट्टीचे रिकार्पेटिंग करण्यात आले होते. सुमारे ६० कोटी रुपये खर्चुन ३,२०० मीटर लांबीच्या धावपट्टीचे रिकार्पेटिंग करण्यात येत आहे.