केलेल्या कामावर काँग्रेसला मतदान करा : सुनील केदार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2021 14:07 IST2021-09-28T13:32:32+5:302021-09-28T14:07:17+5:30
आजवर कामांची पावती म्हणून मतरुपी आशीर्वाद देऊन काँग्रेस पक्षांच्या उमेदवारांना विजयी करा, असे आवाहन राज्याचे पशुसंवर्धनमंत्री सुनील केदार यांनी केले. ते जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या पोटनिवडणुकीच्या प्रचार दौऱ्याप्रसंगी बोलत होते.

केलेल्या कामावर काँग्रेसला मतदान करा : सुनील केदार
नागपूर : जानेवारी २०२० ला झालेल्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत नागपूर जिल्ह्यातील सुज्ञ जनतेने काँग्रेस पक्षाला भरघोस मतदान करून एकहाती सत्ता दिली. या मतरुपी आशीर्वादाचा स्वीकार करून जिल्हा परिषरदेचे सर्व पदाधिकारी व सदस्य लोकोपयोगी कामाला लागले. यात कोरोनाकाळात केलेली आरोग्याची कामे ही प्रमुख आहेत, या कामांची पावती म्हणून मतरुपी आशीर्वाद देऊन काँग्रेस पक्षांच्या उमेदवारांना विजयी करा, असे आवाहन राज्याचे पशुसंवर्धनमंत्री सुनील केदार यांनी केले.
जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या पोटनिवडणुकीच्या प्रचार दौऱ्याप्रसंगी ते बोलत होते. केदार यांनी कळमेश्वर तालुक्यातील तेलगाव, तेलकामठी, तिष्टी, लोहगड, सवंद्री, कोहळी, म्हसेपठार, मांडवी इत्यादी गावांत प्रचार दौरा केला. ओबीसी आरक्षणामुळे होऊ घातलेली ही पोटनिवडणूक भाजपची देण आहे. सर्वोच्च न्यायालयात दाखल झालेल्या याचिकेदरम्यान राज्यशासनाने केंद्र सरकारला जातिनिहाय डेटा मागितला असता तो केंद्राने सदर डेटा न दिल्याने ही पोटनिवडणूक होत आहे. यामुळे भाजपचा ओबीसी विरोधी चेहरा हा जनतेपुढे आला असल्याची टीका त्यांनी केली.
देशाची प्रगती काही एका दिवसात झालेली नाही, यात शेतकरी,कष्टकऱ्यांचे मोठे योगदान आहे. मात्र, आज त्यांचीच विटंबना भाजप शासन करीत आहे. परंतु, आता भाजपचा खरा चेहरा जनतेसमोर आला असून आता जनताच त्यांना त्यांची जागा दाखवणार असल्याचेही केदार यावेळी म्हणाले.