विष्णू मनोहरांनी बाप्पासाठी तयार केला ३००० किलोचा महाप्रसाद; उपमुख्यमंत्र्यांनीही लावला हातभार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2022 03:14 PM2022-09-08T15:14:17+5:302022-09-08T15:24:45+5:30

नागपुरात एकाच कढईत बनवला तीन हजार किलोचा महाप्रसाद

Vishnu Manohar prepared 3000 kg mahaprasad for Ganpati Bappa Devendra Fadnavis also contributed | विष्णू मनोहरांनी बाप्पासाठी तयार केला ३००० किलोचा महाप्रसाद; उपमुख्यमंत्र्यांनीही लावला हातभार

विष्णू मनोहरांनी बाप्पासाठी तयार केला ३००० किलोचा महाप्रसाद; उपमुख्यमंत्र्यांनीही लावला हातभार

Next

नागपूर : सुग्रास व्यंजन बनविण्यासाठी ओळखले जाणारे विश्वविक्रमधारी शेफ विष्णू मनोहर यांनी साऱ्यांचेच आराध्य असलेल्या बाप्पासाठी तब्बल ३ हजार किलोचा प्रसाद तयार केला आणि त्याचे वितरण केले. त्यांच्या या प्रसाद बनविण्याच्या उपक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हजेरी लावली आणि कढईमध्ये प्रसादाची सामग्री टाकण्यासोबतच डाव सुद्धा फिरवला.

श्रीगणेशोत्सवाच्या पर्वावर शेफ विष्णू मनोहर यांनी बाप्पासाठी अडीच हजार किलोचा चना डाळीचा प्रसाद तयार करण्याची आणि वितरित करण्याची घोषणा केली होती. त्यानुसार बुधवारी उत्तर अंबाझरी मार्गावरील अमृतभवन येथे सकाळी ९ वाजतापासूनच तयारी सुरू झाली. चुलीवर कढई चढवण्यास सुरुवात झाली आणि दुसरीकडे प्रसिद्ध भजन गायक कमलेश पांडे यांचे सुरेल स्वर बाहेर पडू लागले. प्रसाद आणि गायनाची जणू जुगलबंदीच सुरू झाली. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी महापौर दयाशंकर तिवारी, आ. ॲड. अभिजित वंजारी, आ. विकास ठाकरे, जिल्हाधिकारी विपिन इटनकर आदींनी भेट देत प्रसाद बनविण्याच्या उपक्रमात आपला सहभाग दर्शवला.

या प्रसादासाठी सुमारे दीड हजार किलोची विशेष कढई ठेवण्यात आली होती. त्यात ६५० किलो चना डाळ, १०० किलो शेंगदाणे, १५० किलो खाण्याचे तेल, ८० किलो आले, १०० किलो कोथिंबिर व कढीपत्ता, ४० किलो धने पुड, १५ किलो जिरे, १० किलो गरम मसाला, २५ किलो मिठ, ५० किलो चिंच, २५ किलो गूळ, १० किलो हळद, १५ किलो तिखड, २ किलो हिंग व एक हजार लिटर पाणी अशी सामग्री वापरण्यात आली. अशा सगळ्या सामग्रीअंती प्रसादाचे वजन अडीच हजार किलोवरून तीन हजार किलोवर गेले.

प्रसाद तयार होत असताना सभागृहाबाहेर ढोल-ताशा पथकाच्या वादनाने वातावरण निर्मितीही केली होती. प्रसाद तयार होताच गणपती बाप्पाचा जयघोष करण्यात आला. आरतीनंतर प्रसादाचे वितरण करण्यात आले आणि मोठ्या संख्येने नागरिक भक्तांनी प्रसादाचा आस्वाद घेतला.

Web Title: Vishnu Manohar prepared 3000 kg mahaprasad for Ganpati Bappa Devendra Fadnavis also contributed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.