नोटाबंदीमुळे दहशतवादाला लगाम

By Admin | Updated: December 24, 2016 02:42 IST2016-12-24T02:42:06+5:302016-12-24T02:42:06+5:30

केंद्र सरकारने केलेल्या नोटाबंदीमुळे दहशतवाद्यांना होणारा पतपुरवठा बंद झाला आहे. पाकिस्तान, दाऊद

Violation of terrorism due to non-voting | नोटाबंदीमुळे दहशतवादाला लगाम

नोटाबंदीमुळे दहशतवादाला लगाम

मनिंदरजितसिंग बिट्टा : मोदी सरकारचे केले कौतुक
नागपूर : केंद्र सरकारने केलेल्या नोटाबंदीमुळे दहशतवाद्यांना होणारा पतपुरवठा बंद झाला आहे. पाकिस्तान, दाऊद यांच्यासह देशविरोधकांकडे असलेले हजारो कोटी रुपये मातीमोल झाले आहेत. काश्मिरात दहशतवाद्यांना बाहेरून होणारी मदत बंद झाली असून, त्यामुळेच तेथील दगडफेक थांबली आहे. नोटाबंदीमुळे इकॉनॉमिक टेररिझम व नार्को टेररिझमला लगाम लावण्यात बऱ्यापैकी यश आले आहे, असा दावा करीत अ. भा. आतंकवाद विरोधी संघटनेचे संयोजक मनिंदरजितसिंग बिट्टा यांनी नोटाबंदीच्या निर्णयावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारचे भक्कमपणे समर्थन केले.
नागपुरात एका सोहळ्यात सहभागी होण्यासाठी आले असता बिट्टा यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, मागील दहा वर्षांच्या कार्यकाळात केंद्र सरकारने दहशतवादाप्रति नरमाईचे धोरण घेतले होते. आता या सरकारने धोरण बदलत कडक पावले उचलली आहेत. पूर्वी आपल्या जवानांचे शीर कापले जायचे तरी आपण शांत बसायचो. आता सीमेपलीकडून एक गोळी चालली तर १०० गोळ्यांनी उत्तर दिले जात आहे. पाकिस्तानात घुसून सर्जिकल स्ट्राइक केले व ४८ दहशतवाद्यांना ठार केले. यामुळे आपल्या सैन्याचे मनोबल वाढले असून पाकने धास्ती घेतली आहे. आपण सीमेवर सैनिकांची भेट घेतली असता सैनिकांनी त्यावर समाधान व्यक्त केल्याचे त्यांनी सांगितले. शेवटी ही कारवाई करण्याचा आदेश संरक्षण मंत्रालयाने दिला, असे सांगत त्यांनी केंद्र सरकारचे कौतुक केले. दुसऱ्या एका प्रश्नाच्या उत्तरात दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या काळातही सर्जिकल स्ट्राइक करण्यात आला होता, असे स्पष्ट केले.
मी मोदी किंवा भाजपचा समर्थक नाही. मात्र, मोदींना उत्तर प्रदेशच्या निवडणुकीची चिंता नाही तर देश महत्त्वाचा आहे, असे सांगत इकॉनॉमिक टेररिझम संपविण्यासाठी उचललेल्या पावलांचे आपण समर्थक असल्याचे त्यांनी सांगितले. काश्मिरात मारल्या गेलेला दहशतवादी बुरहान वाणी याच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्याची घोषणा मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी केली आहे. एका दहशवाद्याला अशी मदत करणे योग्य नाही. केंद्र सरकारने या मदतीवर निर्बंध घालावे, अशी मागणी त्यांनी केली. सोबतच कोणत्याही पक्षाने राजकीय फायद्यासाठी सैन्य, लढाई अशा मुद्यांचा वापर करू नये, असा सल्लाही त्यांनी दिला. यावेळी नगरसेवक डॉ. छोटू भोयर उपस्थित होते.(प्रतिनिधी)

अ‍ॅन्टी टेररिस्ट मिल्ट्री कोर्ट स्थापन करा
दहशतवादी, दहशतवाद्यांना मदत करणारे तसेच दहशतवाद्यांना आर्थिक पाठबळ देणाऱ्यांवर जलदगतीने खटला चालवून त्यांना सहा महिन्यात फाशी, जन्मठेप अशी शिक्षा सुनावता यावी यासाठी अ‍ॅन्टी टेररिस्ट मिल्ट्री कोर्ट स्थापन करावे, अशी मागणी बिट्टा यांनी केली. काश्मिरात लागू असलेले कलम ३७० हे दहशतवादाचे मूळ असल्याचे सांगत कलम सर्वप्रथम रद्द करावे, अशी मागणीही त्यांनी केली.
फुटिरवाद्यांच्या बँक खात्यांची चौकशी करा
काश्मीरप्रश्नी फुटीरवादी नेते दिल्लीत येऊन चर्चा करतात. त्यांना उच्च दर्जाची सुरक्षा व्यवस्था पुरवली जाते. त्यावर लाखो रुपये खर्च होतात. या फुटीरवादी नेत्यांची सुरक्षा व्यवस्था काढून घ्यावी तसेच यांच्या बँक खात्यांची चौकशी करून यांना पैसा कुठून येतो ते शोधावे, अशी मागणीही बिट्टा यांनी केली.
नक्षल्यांचेही १२ हजार कोटी नष्ट
नोटाबंदीमुळे नक्षलवाद्यांचेही १२ हजार कोटी रुपये नष्ट झाल्याचा दावा बिट्टा यांनी केला. सीआरपीएफ नक्षलवाद्यांशी उत्तमपणे लढत आहे. लोकांनाही विश्वासात घेत आहे. छत्तीसगड, झारखंड येथे मोठ्या कारवायांना सुरुवात झाली आहे, असे सांगत सर्जिकल स्ट्राइकमुळे आता नक्षल्यांनाही चोख उत्तर दिले जाईल, असा विश्वास निर्माण झाल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title: Violation of terrorism due to non-voting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.