‘त्या’ साहित्यिकाला अध्यक्ष होण्यासाठी गावही मोठेच हवे
By Admin | Updated: December 19, 2015 02:47 IST2015-12-19T02:47:31+5:302015-12-19T02:47:31+5:30
ते तसे मोठे साहित्यिक आणि कादंबरीकार आहे. त्यांचा सन्मानही आहे आणि त्यांची संवेदनशीलता टोकाची सूक्ष्म आणि लिखाणही वास्तववादी आहे.

‘त्या’ साहित्यिकाला अध्यक्ष होण्यासाठी गावही मोठेच हवे
नागपूर : ते तसे मोठे साहित्यिक आणि कादंबरीकार आहे. त्यांचा सन्मानही आहे आणि त्यांची संवेदनशीलता टोकाची सूक्ष्म आणि लिखाणही वास्तववादी आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न त्यांनी एका कादंबरीतून मांडले. ही कादंबरी वाचताना अनेकांच्या डोळ्यात शेतकऱ्यांच्या वेदना समजून घेताना पाणी आले. त्यांचे लेखन निर्विवाद प्रभावी आहेच. त्यांच्या याच कादंबरीवर नंतर चित्रपटही काढण्यात आला. त्यांना सर्वोच्च पुरस्कारही लाभला. या लेखनासाठी वाचक त्यांच्यावरही प्रेम करतात. पण साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होण्यासाठी त्यांची एक अट होती. गाव मोठे असावे.
विदर्भ साहित्य संघातर्फे दरवर्षी विदर्भ साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात येते. ग्रामीण भागातील लेखकांना, कविंना संधी मिळावी आणि ग्रामीण साहित्याला मुख्य प्रवाहात सहभागी करून साहित्य चळवळ वाढावी. हा संस्थेचा उद्देश आहे. विदर्भ साहित्य संघ ही एक मोठी परंपरा आणि इतिहास असलेली साहित्य क्षेत्रातील महत्त्वाची संस्था आहे. जिल्हा आणि तालुका पातळीवर असलेल्या शाखा आणि जवळपास आठ हजार सदस्य असलेल्या या संस्थेचे मोठे जाळे विदर्भात आहे. संस्थेतर्फे प्रादेशिक पातळीवर आयोजित होणाऱ्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी संस्थेतर्फे ‘त्या’ साहित्यिकाला तीन वेळा विनंती करण्यात आली. अर्थात संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी तीन वेळा ‘त्या’ साहित्यिकाचे नाव सर्वानुमते अध्यक्षपदासाठी निवडले होते. पण ग्रामीण भागातील गावात साहित्य संमेलनाचे आयोजन होत असल्याने त्यांनी नकार दिला. शेतकऱ्यांच्या व्यथा कादंबरीतून व्यक्त करणाऱ्या त्यांना संमेलनाचे गाव शहरीच हवे होते. आता विदर्भ साहित्य संघाचे साहित्य संमेलन चंद्रपूर येथे आयोजित करण्यात येणार आहे. चंद्रपूरच्या आयोजक संस्थेवर ‘त्या’ साहित्यिकाने आपणच अध्यक्षपदासाठी आपलेच नाव अंकुरले पाहिजे म्हणून पेरणी केल्याने वैचारिक गोंधळ वाढला आहे. विदर्भ साहित्य संघाच्या पदाधिकाऱ्यांना चंद्रपूर परिसरातील साहित्यिकाला अध्यक्षपद देण्याची इच्छा आहे. पण ‘त्या’ साहित्यिकाने टाकलेला दबाव मोठा आहे. त्यांचे नाव आयोजकांना टाळता येणे शक्य नाही म्हणून ‘त्यांनी’ सद् आनंद व्यक्त केला आहे. देशात सहिष्णू- असहिष्णू चर्चा सुरू असताना या मुद्यावर आयोजकांचे मुख बंद झाले आहे.
ज्यांनी शेतकऱ्यांच्या वेदनांवर आणि जीवनावर अतिशय मर्मग्रही कादंबरी लिहिली त्यांना संमेलनाचे अध्यक्षपद स्वीकारण्यासाठी ते संमेलन शहरी भागातच व्हावे, अशी अट का टाकावी लागली. ग्रामीण संघर्ष, जीवन आणि शेतीच्या व्यथा मांडणाऱ्या ‘त्या’ साहित्यिकाला ग्रामीण गावाबद्दल का कमीपणा वाटावा, असे प्रश्न साहित्य क्षेत्रात दबक्या आवाजात चर्चेला आले आहेत. अद्याप संमेलनाध्यक्षांचे नाव ठरलेले नाही. विदर्भ साहित्य संघाचे पदाधिकारी याबाबत काहीही बोलायला तयार नाहीत. आयोजक संस्थेनेही त्यांच्या सन्मानापुढे नमते घेण्याचीच भूमिका घेतल्याचे कळले आहे. जीवनानुभवातून आलेले साहित्य सकस असते तर जीवनानुभवाच्या भूमीवरचे अध्यक्षपद कमीपणाचे कसे, असे काही प्रश्न वैचारिक स्तरावर चर्चेला आले आहेत. (प्रतिनिधी)