‘विक्रम प्रतिसाद दे, सिग्नल तोडलास तरी आम्ही चालान फाडणार नाही’
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2019 16:11 IST2019-09-09T22:28:54+5:302019-09-10T16:11:50+5:30
नागपूर शहर पोलिसातील एका अधिकाऱ्याने चक्क आपल्याच खात्याच्या अधिकृत ट्विटरवरून ट्विट केले, 'प्रिय विक्रम, कृपया प्रतिसाद दे. तू सिग्नल तोडलास तरी आम्ही चालान फाडणार नाही.'

‘विक्रम प्रतिसाद दे, सिग्नल तोडलास तरी आम्ही चालान फाडणार नाही’
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : इस्त्रोने चंद्रावर पाठविलेले यान अगदी शेवटच्या क्षणी संपर्क क्षेत्राबाहेर गेले. काही वेळातच यान चंद्रावर उतरणार असतानाच तिकडून सिग्नल मिळणे बंद झाले. अवघा देशच चिंतातूर झाला. अशावेळी लोकांची चिंता वाहणारे पोलीस खाते कसे बरे शांत राहणार! नागपूर शहर पोलिसातील एका अधिकाऱ्याने चक्क आपल्याच खात्याच्या अधिकृत ट्विटरवरून ट्विट केले, 'प्रिय विक्रम, कृपया प्रतिसाद दे. तू सिग्नल तोडलास तरी आम्ही चालान फाडणार नाही.'
नागपूर शहर पोलिसांच्या अधिकृत ट्विटरवरून ट्विट झालेला हा संदेश वाईट नसला तरी काही क्षणात देशभर पसरलेल्या या संदेशामुळे बरीच खळबळ मात्र उडालीयं. वाहतुकीचे नियम मोडल्यावर केल्या जाणाऱ्या दंडाच्या आकारणीमध्ये सरकारने याच आठवड्यात बरीच वाढ केली आहे. त्यावर समाजमाध्यमांपासून तर सर्वसामान्य जनतेमध्ये बराच गदारोळ उडालेला आहे. त्यावर बऱ्याच उलटसुलट प्रतिक्रियाही उमटत आहेत. देशभर या चर्चा सुरू असतानाच इस्रोच्या चांद्रयान-२ मोहिमेतील विक्रम लँडरचा संपर्क अकस्मातपणे चंद्रापासून अवघ्या २.१ किलोमीटरवर असताना तुटला. शास्त्रज्ञांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करूनही अंतराळातून सिग्नल मिळत नव्हता. त्यामुळे संपूर्ण देशच चिंतातूर झाला होता. अशातच सिग्नल मिळाल्याचे वृत्त आले आणि आशेचा सूर गवसला. नेमक्या या गंभीर वातावरणातही आपली विनोदबुद्धी शाबूत ठेऊन नागपूर पोलीस विभागातील एका अधिकाऱ्याने वरील ट्विट इंग्रजीतून केले. सोमवारी दुपारी १.१५ वाजता झालेले हे ट्विट काही क्षणातच सर्वदूर पोहचले. हे ट्विट वाचल्यावर अनेकांनी पोलिसांच्या कल्पकतेचे कौतुक केलेच, मात्र दुसरीकडे त्यावर उलटसुलट प्रतिक्रियाही उमटायला लागल्या आहेत.
पोलीस आणि पोलीस खाते सदैव तणावामध्ये असते. या तणावातही विनोदबुद्धी वापरून स्वत:सह सहकाऱ्यांना आणि इतरांनाही खळखळून हसायला लावणारे अधिकारी-कर्मचारी असतातच. मोटार वाहन कायद्याच्या तरतुदीतील वाढलेल्या दंडाच्या पार्श्वभूमीवर विक्रमच्या सिग्नलचा संबंध जोडल्याने पोलिसांचे हे ट्विट अधिक चर्चेचे आणि हास्य फुलविणारे ठरले आहे.
युजर्सकडून या ट्विटवर बऱ्याच प्रतिक्रिया उमटत आहेत. १३३ कोटी भारतीयांच्या आशा विक्रमकडून असल्याने पोलिसांच्या या ट्विटचे कौतुकही अनेकांनी केले आहे. तर दुसरीकडे मात्र, ‘काहीही. एखाद्या वरिष्ठ अधिकाऱ्याने देखील त्याच्या स्वत:च्या खात्यातून असे केले तर ठीक आहे. पण एखाद्या विभागाचे अधिकृत खाते वापरून असे वाक्य लिहिणे चांगले नाही,’ अशी प्रतिक्रियाही उमटत आहे. ‘ग्रेट सेन्स ऑफ ह्यूमर’ अशा शब्दातही पोलिसांचे कौतुक होत आहे, तर दुसरीकडे पोलिसांच्या कायदारक्षणावरही चर्चा सुरू झाल्या आहेत.
एकंदर काहीही का असेना, पण या ट्विटच्या निमित्ताने नागपूरच्या पोलिसांनी देशभर धमाल उडवून दिलीयं, हे मात्र नक्कीच!