राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाल व शिशू स्वयंसेवकांचा विजयादशमी उत्सव उत्साहात संपन्न
By योगेश पांडे | Updated: September 28, 2025 23:56 IST2025-09-28T23:54:07+5:302025-09-28T23:56:45+5:30
संस्कार-शिस्त आणि राष्ट्रभक्तीचे बीज, बाल स्वयंसेवकांचे उर्जावान संचलन

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाल व शिशू स्वयंसेवकांचा विजयादशमी उत्सव उत्साहात संपन्न
योगेश पांडे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर: कोवळ्या वयातील पावलांना अनुशासनाची जोड, निरागस डोळ्यांत चमकणारे राष्ट्रप्रेम, आणि शिस्तबद्ध संचलनात दिसलेली संस्कारांची झलक...अशा अद्वितीय संगमाचा नागपुरकरांना रविवारी सायंकाळी अनुभव मिळाला. संस्कारांतून नागरिक, नागरिकांतून राष्ट्र असे विचारअमृत घेणाऱ्या या लहान स्वयंसेवकांना पाहून नागरिकदेखील त्याच उर्जेने प्रतिसाद देताना दिसले. रविवारी शहरात विविध ठिकाणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, नागपूर महानगराच्या बाल व शिशू स्वयंसेवकांच्या शस्त्रपूजन व विजयादशमी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.
२ ऑक्टोबर रोजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे रेशीमबाग मैदानावर विजयादशमी उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. तत्पूर्वी रविवारी शस्त्रपूजन व विजयादशमी सोहळ्याचे आयोजन शहरातील आठ विविध मैदानांवर करण्यात आले होते. सर्वच ठिकाणांवर सायंकाळी बाल स्वयंसेवकांनी उपस्थितांसमोर निरनिराळी प्रात्यक्षिके सादर केली. यात लेझिम, योगासने, कवायती, दंडयोग, नियुद्ध यांचा प्रामुख्याने समावेश होता. शिशु स्वयंसेवकांनी कृष्णयोग, श्रीराम योग, विठ्ठल योग व हनुमान योगाची प्रात्यक्षिके सादर केली. शेवटी घोषाचे वैशिष्ट्यपूर्ण प्रात्यक्षिक झाले.कार्यक्रमाअगोदर सर्वच ठिकाणी बाल स्वयंसेवकांचे पथसंचलन झाले. यावेळी ठिकठिकाणच्या संघ शाखेचे स्वयंसेवक व नागरिक उपस्थित होते. शहरातील संघ पदाधिकारी व जेष्ठ स्वयंसेवकांनीदेखील यावेळी आवर्जून उपस्थित राहून या बालकांचा हुरूप वाढविला.
वक्त्यांचा सूर, संघाची शाखा हे व्यक्ती निर्माणाचे केंद्र
विविध ठिकाणी झालेल्या कार्यक्रमांत वक्त्यांनी संघाची शाखा हे व्यक्तीनिर्माणाचे केंद्र असल्याची भावना व्यक्त केली. सोमलवाडा भागातील उत्सव सुरेंद्रनगर येथील नासा मैदानावर झाला. उद्योजक शशिकांत मानापुरे व संघाचे महानगर महाविद्यालयीन विद्यार्थी प्रमुख प्रसन्न महानकर तसेच भाग संघचालक श्रीकांत चितळे उपस्थित होते. मोहिते भागातील बाल स्वयंसेवकांचा उत्सव बगडगंज स्थित गरोबा मैदान येथे आयोजित करण्यात आला. कच्छ पाटीदार समाजाचे महामंत्री शांतीलाल पटेल, विदर्भ प्रांत बाल कार्य प्रमुख अश्विन जयपुरकर, संघचालक रमेश पसारी यावेळी उपस्थित होते. नंदनवन भागाचा उत्सव डॉ.हेडगेवार स्मारक समितीच्या यादव भवनात पार पडला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर विधी विद्यापीठाचे संचालक डॉ. रवीशंकर मोर, कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाचे सहाय्यक कुलसचिव डॉ. सचिन कठाळे, नागपूर महानगर संघचालक श्री राजेश लोया आणि नंदनवन भाग संघचालक अशोक बुजोने यांची उपस्थिती होती. तेथे सांघिक गीत, संस्कृत सुभाषित, अमृतवचन आणि वैयक्तिक गीत या बौद्धिक विषयांचे सादरीकरण बाल स्वयंसेवकांनी केले.